CoronaVirus: कोरोनाचे केंद्रबिंदू असलेल्या मुंबईला वीजबिलासाठी मुदतवाढ नाहीच

CoronaVirus: कोरोनाचे केंद्रबिंदू असलेल्या मुंबईला वीजबिलासाठी मुदतवाढ नाहीच

महावितरणच्या वीज ग्राहकांना मार्च आणि एप्रिल महिन्यांसाठी वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पण मुंबईतील वीज ग्राहकांना मात्र ही सवलत मिळणार नाही. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी फक्त उर्वरीत महाराष्ट्रासाठी ही सवलत जाहीर केल्याने मुंबईकर मात्र या घोषणेतून अलिप्त राहिले आहेत. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे मुंबई शहर हे देशातील कोरोनाचे केंद्रबिंदू ठरत आहे. त्यामुळेच मुंबईकरांना सर्वाधिक या सवलतीची गरज आहे. मुंबई बेस्ट, टाटा पॉवर आणि अदाणीच्या वीज ग्राहकांची संख्या ५० लाखांहून अधिक आहे.

वीज ग्राहकांना दिलासा मिळणे गरजेचे

राज्यातील महावितरणच्या अडीच कोटी वीज ग्राहकांना ऊर्जा मंत्र्यांच्या घोषणेमुळे दिलासा मिळाला आहे. पण मुंबईतील वीज ग्राहकांच्या बाबतीत मात्र कोणताही घोषणा झालेली नाही. मुंबईतील वीज वितरण कंपन्याही मुंबईच्या वीज ग्राहकांना दिलासा म्हणून सवलत मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. मुंबईत सर्वाधिक वीज ग्राहक हे रहिवासी वीज ग्राहक आहेत. म्हणूनच या वीज ग्राहकांना दिलासा मिळणे गरजेचे आहे. मुंबईतील झोपडी भागांमध्ये घरगुती ग्राहकांची मोठी संख्या आहे. रिडिंग उपलब्ध नसल्याने गेल्या तीन महिन्यांच्या सरासरीवर आधारीत वीजबिल देण्याचे आदेश राज्य वीज नियामक आयोगाकडून देण्यात आले आहेत. मुंबईतील झोपडी भागात रिडिंग घेता येत नसल्याने आता मुंबईतही सरासरी वीजबिल देण्याची वेळ आली आहे. महावितरणच्या वीज ग्राहकांना वीज मीटर रिडिंग पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसारच आता मुंबईकरांसाठी ऊर्जा विभाग वीज बिलात मुदतवाढ देईल असे अपेक्षित आहे. मुंबईतील वीज वितरण कंपन्या आयोगाकडे यासाठी पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. त्यामुळे आयोग काय निर्णय घेणार हे लवकरच स्पष्ट होईल.


हेही वाचा – मुंबईत रस्त्यांची कामे पुन्हा सुरु, नवीन कामे कागदावरच


 

First Published on: April 15, 2020 12:01 AM
Exit mobile version