घरCORONA UPDATEमुंबईत रस्त्यांची कामे पुन्हा सुरु, नवीन कामे कागदावरच

मुंबईत रस्त्यांची कामे पुन्हा सुरु, नवीन कामे कागदावरच

Subscribe

मुंबईतील अनेक विकास कामे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रखडलेली असून हाती घेण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांना मात्र आता सुरुवात करण्यात आली आहे. कोरोनामुळे कुणी कामगार मिळत नसतानाही कंत्राटदारांनी महापालिका आयुक्तांच्या विनंतीला मान देत सुरु असलेली कामे पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. ज्यामुळे पावसाळ्यात या खोदलेल्या रस्त्यांमुळे मुंबईकरांना त्रास होणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. मात्र, सध्या रस्त्यांची कोणतीही नवीन कामे हाती घेण्यात आलेली नाहीत.

मुंबईत अनेक रस्त्यांचे सिमेंटीकरण आणि डांबरीकरणाची कामे हाती घेण्यात आली होती. या रस्त्यांच्या विकासामध्ये अनेक रस्ते खोदून ठेवण्यात आले होते तर काही ठिकाणी पर्जन्य जल तसे जल वाहिनी टाकण्याचे काम सुरु होते. परंतु कोरोनामुळे लॉक-डाऊन करण्यात आल्यामुळे ही सर्व कामे ठप्प पडली होती. मात्र, खोदून ठेवलेली ही कामे पूर्ण न केल्यास ऐन पावसाळ्यात मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल. तसेच खड्डयांचीही समस्या उद्भवण्याची भीती होती.

- Advertisement -

एका बाजूला या लॉक-डाऊनमुळे रस्ते मोकळे असल्यामुळे रस्त्यांची कामे सुरळीत करता येतील. यासाठी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी स्थायी समितीची विशेष बैठक बोलावून तब्बल १८५ रस्त्यांची कामे मंजूर करून दिली होती. परंतु ही कामे मंजूर केल्यानंतर अवघ्या चार दिवसांमध्ये देशात लॉकडाऊन करण्यात आला. यामुळे कामगार, मजूर आपापल्या गावी निघून गेला तर कुणी या आजारामुळे घरीच बसला. त्यामुळे कामगार, मजुरांअभावी ही कामे कंत्राटदारांना हाती घेता आलेली नाहीत. त्यामुळे अखेर जी कामे हाती घेतलेली आहेत आणि खोदून ठेवलेली आहेत, ती तरी पूर्ण करावीत, असे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार आयुक्तांचा शब्द शिरसावंद्य मानून काही कंत्राटदारांनी खोदून ठेवलेली रस्त्यांची काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कामगार, मजुरांना दुप्पट मानधन देऊन त्यांना कामावर रुजू करून घेतले आहे. त्यामुळे कंत्राटदारांकडून सुरु असलेली कामे केली जात आहेत. त्यामुळे काही ठिकाणी महापालिकेच्या रस्त्यांची कामे सुरु असल्याची दिसून येत असून कोणत्याही मंजूर नवीन रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -