कुर्ल्यातील १७ हॉटेल्सना नोटीस

कुर्ल्यातील १७ हॉटेल्सना नोटीस

आग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत केली कुचराई

मुंबईतील सर्व हॉटेल्स, मॉल्स तसेच शॉपिंग सेंटरमधील आग प्रतिबंधक उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत तपासणी मोहीम अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांसह महापालिकेच्या अधिकार्‍यांनी संयुक्तपणे सुरुवात केली आहे. त्यानुसार कुर्ला एल विभागातील हॉटेल्ससह इतर इमारतींची पाहणी करण्यात आली आहे. यामध्ये कुर्ल्यातील १७ हॉटेल्सना अग्निशमन दलाच्यावतीने शुक्रवारी नोटीस बजावण्यात आली आहे.

मुंबईतील सर्व इमारती, हॉटेल्ससहित शॉपिंग सेंटर व मॉल्सच्या अग्निसुरक्षेच्या माध्यमातून तपासणी करण्याचे निर्देश महापलिका आयुक्तांनी दिल्यानंतर कुर्ल्यातील एल विभागात या मोहिमेला सुरुवात झाली आहे. महापालिकेच्यावतीने सहाय्यक अग्निशमन अधिकारी यांच्या अधिपत्याखाली अधिकार्‍यांचा एक स्वतंत्र कक्ष प्रत्येक विभाग कार्यालयाच्या अखत्यारित बनवण्यात आला आहे. २४ विभाग कार्यालयांमध्ये अग्निशमन दलाचे कक्ष स्थापन असून त्यांच्याबरोबर विभाग कार्यालयातील परवाना, आरोग्य आणि इमारत व कारखाना विभागाच्या अधिकार्‍यांसह संयुक्त तपासणी मोहीम राबवली जात आहे. मात्र गुरुवारी कुर्ल्यामध्ये लागलेल्या आगीच्या घटनेनंतर येथील हॉटेल्सची विशेष तपासणी मोहीम अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांसह महापालिकेच्या अधिकार्‍यांनी घेतली. यामध्ये १७ हॉटेल्समध्ये अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन केले जात नसल्याची बाब समोर आली आहे. त्यानुसार त्यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी दिली आहे.

कुर्ल्यातील या हॉटेल्सना बजावली नोटीस
कुर्ला पश्चिम परिसर – सनलाईट गेस्ट हाऊस, हॉटेल संजारी पॅलेस, हॉटेल रॉयल रेसिडेन्सी, बीकेसी पॅलेस, पर्ल व्हीव, पॅलेस रेसिडेन्सी, मुघल फ्लेवर, हॉटेल खान फ्लेवर, के.एफ. रेसिडेन्सी, जनता तवा अ‍ॅण्ड ग्रील रेस्तराँ, गोल्डन सागर, गोल्डन पार्क, इम्बॅसी ग्रँड, डिसेंट गेस्ट हाऊस, प्रियदर्शनी गेस्ट हाऊस

First Published on: January 14, 2019 4:22 AM
Exit mobile version