आता सर्व रेल्वे स्थानकांत ‘पोलीस व्हिजिबिलींग’

आता सर्व रेल्वे  स्थानकांत ‘पोलीस व्हिजिबिलींग’

पोलीस व्हिजिबिलींग

दादर रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे पोलीस दल आणि राज्य लोह पोलीस यांच्या संयुक्तरित्या राबवण्यात आलेल्या ‘मिशन पोलीस व्हिजिबिलींग’ या मोहिमेचे अनुकरण आता सर्व रेल्वे स्थानकांकडून करण्यात येणार आहे. मुंबईच्या रेल्वे स्थानकांंमध्ये गुन्हेगारांवर नजर ठेवता यावी आणि लोकांच्या मनात पोलिसांबद्दलचा विश्वास कायम राहावा, यासाठी दादर रेल्वे स्थानकात मिशन पोलीस व्हिजिबिलींग ही मोहीम राबवण्यात येत होती. या संदर्भातील बातमी ‘आपलं महानगर’ने ‘मिशन दादर रेल्वे पोलीस’ या मथळ्याखाली शनिवारी ११ ऑगस्टच्या अंकात प्रसिद्ध केली होती. या बातमीनंतर रेल्वे पोलीस दलात चर्चा झाली आणि आता दादर रेल्वे स्थानकामध्ये राबवण्यात येणारा उपक्रम सर्व उपनगरी रेल्वे स्थानकांमध्ये राबवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून समजली.

कुर्ला, वांद्रे आणि कांजूरमार्गमध्ये मोहीम सुरु
कुर्ला, वांद्रे, कांजुरमार्ग आणि सीएसएमटी या उपनगरीय रेल्वे स्थानकांवर अशा पद्धतीचे पोलीस व्हिजिबिलिंग सुरु झाले असून गेल्या दोन दिवसात याची ट्रायल घेण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांकडून मिळाली. वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्याचे सुनीलकुमार जाधव यांनी या मोहिमेसाठी ५० रेल्वे पोलिसांची एक टीम तयार केली आहे. त्यांनीसुद्धा स्थानक परिसरात गस्त घालायला सुरुवात केली आहे. स्थानकात असलेल्या गर्दीमुळे अनेक पाकीटमार चोर्‍या करतात. अशा गुन्हेगारांवर या व्हिजिबिलिंगमुळे आता पोलिसांची करडी नजर असणार आहे.

मध्य आणि पश्चिम दोन्ही मार्गावर ‘मिशन पोलीस’
रेल्वेच्या दोन्ही मार्गावर मध्य आणि पश्चिमवर असणार्‍या सर्व स्थानकांवर रेल्वे पोलिसांची टीम यापुढे गस्त घालणार असून चोर्‍या, तसेच अनेक प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये घट होण्याची शक्यता आहे. रेल्वे मार्गावर महत्वाच्या आणि मोठ्या असणार्‍या स्थानकांवर वाढत्या गर्दीमुळे पोलीस बळामध्येही वाढ करण्यात येणार आहे. बांद्रा स्टेशनवर गस्त घालण्यात येणार्‍या टीममध्ये जवळपास ५० रेल्वे पोलिसांचा समावेश आहे. १५ ऑगस्ट आणि बकरी ईदच्या निमित्ताने खबरदारी म्हणून दिवसातून ४ ते ५ वेळा स्थानक परिसरात गस्त घालायला सुरुवात केली आहे.

रेल्वे परिसरात पोलिसांनी गस्त घालायला सुरुवात केल्यापासून रेल्वे स्थानकात वावरणार्‍या लोकांच्या मनात विश्वास निर्माण होत आहे. गुन्हेगारांना आळा बसवण्यासाठी पोलीस नेहमीच प्रयत्न करतात, पण अशा वेगळ्या उपक्रमामुळे आम्हाला आणखी फायदा होईल. आम्हीसुद्धा ही मोहीम नुकतीच सुरु केलेली आहे. त्यानुसार आमचे काम सुरु आहे.

– महेश बळवंतराव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कुर्ला रेल्वे स्टेशन.

First Published on: August 14, 2018 12:24 PM
Exit mobile version