बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण!

बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण!

मुंबईचं प्रवेशद्वार असलेल्या गेट वे ऑफ इंडियाजवळच्याच श्यामाप्रसाद मुखर्जी चौकामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत हे अनावरण पार पडलं. यावेळी पक्षीय मतभेद विसरून सर्वच पक्षातील नेतेमंडळींनी उपस्थिती लावली होती. विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे एकाच व्यासपीठावर आल्यामुळे त्याविषयी राजकीय चर्चा सुरू झाली होती. या दोघांनी एकत्रपणे नेतेमंडळींच्या अभिवादनाचा स्वीकार केला. शिवसैनिकांसाठी आणि मनसैनिकांसाठी हा क्षण कदाचित स्वप्नवत असा वाटत असावा.

मुंबई महापालिकेच्यावतीने कुलाबा येथील शामाप्रसाद मुखर्जी चौकात शिवसेनाप्रमुखांचा पुतळा उभारण्यात आला आहे. मूर्तिकार शशिकांत वळके यांनी हा पुतळा तयार केला आहे.

सभेला अभिवादन करतानाची मुद्रा

बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्कच्या मैदानावर त्यांचे दसरा मेळाव्यातील भाषण हा शिवसेनेच्या राजकीय वाटचालीतील ऐतिहासिक आणि महत्वाचा टप्पा आहे. शिवसेनाप्रमुखांची अमोघ वाणी हेच त्‍यांचे ब्रम्‍हास्‍त्र होते. बाळासाहेब ज्‍या वेळेला सभेला संबोधित करायला सुरूवात करायचे, त्यावेळी त्‍यांची जशी मुद्रा असायची तशीच मुद्रा या पुतळयाची आहे. दोन्ही हात उंचावून जनतेला संबोधित करतानाच्या मुद्रेत बाळासाहेबांचा पुतळा आहे.त्‍याखाली शिवसेनाप्रमुख ज्‍या वाक्‍यांनी सभेला सुरूवात करायचे ती ‘जमलेल्‍या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ ही वाक्‍येही कोरण्यात आली आहेत.

फडणवीस, दरेकर यांची उपस्थिती

महाविकास आघाडीमुळे सध्या शिवसेना आणि भाजपचे संबंध टोकाचे ताणले गेले आहेत. तरीही भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे दोघे यावेळी आवर्जून उपस्‍थित होते.

अविस्‍मरणीय क्षण : उद्धव ठाकरे

‘शिवसेनाप्रमुखांचे विचार हे नेहमीच मार्गदर्शक ठरलेले आहेत. ते यापुढेही मार्गदर्शक ठरणार आहेत. आजचा क्षण हा तमाम शिवसैनिक आणि माझ्यासाठी अविस्‍मरणीय क्षण आहे. शिवसेनाप्रमुखांचे सर्वपक्षीय नेत्‍यांशी जवळचे संबंध होते. आज सर्वपक्षीय नेते आपापल्‍या पक्षाचे उंबरठे ओलांडून या निमित्‍ताने एकत्र आले त्याबद्दल सर्वांना धन्यवाद’,अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमानंतर दिली.

First Published on: January 23, 2021 6:29 PM
Exit mobile version