वाढत्या महागाईचा परिणाम! तीनपैकी एका कुटुंबाने दूध खरेदी करणं सोडलं, सर्वेक्षणातून बाब उघड

वाढत्या महागाईचा परिणाम! तीनपैकी एका कुटुंबाने दूध खरेदी करणं सोडलं, सर्वेक्षणातून बाब उघड

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून दूधाचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे लोकांनी दूध पिणं सोडून दिलंय. देशात प्रत्येक तीन कुटुंबापैकी एका कुटुबांने दूध विकत घेणं सोडून दिलं असल्याचं एका सर्वेक्षणातून सिद्ध झालं आहे. ऑगस्ट महिन्यात अमूल, मदर डेअरी, महानंद, गोकूळसारख्या दूध उत्पादकांनी प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ केली आहे. एकीकडे सर्वच वस्तूंच्या किंमती महाग होत असताना, भाजीपाला महागलेला असताना दूध आणि दुग्धजन्य पदार्थही महागल्याने सामान्य जनतेचा महिना अखेरिस खिसा रिकामा होत आहे.

लोकल सर्कल नावाच्या एका संस्थेने ३११ जिल्ह्यांतील २१ हजार लोकांचे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार, पूर्वी जेवढं दूध विकत घेतलं जायचं तेवढंच आजही विकत घेत असल्याचं ६८ टक्के लोकांनी सांगितलं. तर, ६ टक्के लोकांनी सांगितलं की दूधाच्या किंमती वाढल्याने ते स्वस्त ब्रँण्डचे दूध विकत घेतात. ४ टक्के लोक म्हणाले की, ते नेहमीच्याच ब्रॅण्डचे दूध घेतात, मात्र, कमी किंमतीतील दूध घेतात.

सर्व्हेत सहभाग घेतलेल्या २० टक्के लोकांनी दूध विकत घेण्याच प्रमाण कमी केलं असल्याचं सांगितलं. १० हजार ५२२ लोकांपैकी ७२ टक्के लोकांनी सांगितलं की ते अर्धा लिटर किंवा एक लिटर दूधाचं पाऊच खरेदी करतात. तर, १२ टक्के लोक स्थानिक ब्रॅण्डचे, बॉटलमध्ये उपलब्ध होणार दूध खरेदी करतात. तर, १४ टक्के लोक सुट्टे दूध खरेदी करतात. तर फक्त २ टक्के लोक टेट्रा पॅकवाले दूध खरेदी करत असल्याचंही या सर्वेक्षणातून सिद्ध झालं आहे.

दूधाच्या किंमती वाढल्यानंतरही ६८ टक्के कुटुंब तेच दूध खरेदी करतात जे आधी करायचे. मात्र, ३२ टक्के लोकांनी दूध विकत घेणं कमी केलं आहे. किंवा कमी किंमतीतले दूध विकत घेतले जातात.

दरम्यान, येत्या काळात दूध आणखी महागाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजीपालासह दूधही सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे.

First Published on: September 5, 2022 9:04 PM
Exit mobile version