पाच दिवसात एसटीच्या एक हजार गाड्या आरक्षित…

पाच दिवसात एसटीच्या एक हजार गाड्या आरक्षित…

गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेल्या चाकरमान्यांनी आता परतीच्या प्रवासाला एसटीला पंसती दिली आहे. कोकणातून मुंबईत येण्यासाठी एसटीच्या तब्बल १ हजार १४८ बस आरक्षित केल्या असून त्यापैकी ३४६ बसेसचे गट आरक्षण झाले आहे, तर ३६६ बसेसचे व्यक्तिगत आरक्षण फुल्ल झाले आहे. याबरोबरच उर्वरित ४३६ बसेस ह्या अंशतः आरक्षित झालेल्या आहेत. त्यामुळे परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या बसेस सुसाट धावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

२२ हजार चाकरमानी मुंबईत परतणार

यंदाच्या गणेश उत्सवावर कोरोनाचे सावट असल्यामुळे मुंबईतल्या बहुतांश चाकरमान्यांनी कोकणात जाऊन गणपती उत्सव साजरा करण्याचे टाळले. परंतु, ज्या चाकरमान्यांना आपल्या मूळ गावी जाऊन गणपती उत्सव साजरा करण्याची इच्छा होती. त्यांच्यासाठी एसटीने ६ ऑगस्टपासून बस सेवा सुरू केली आहे. मात्र, हे सेवा सुरू करताना बराच उशीर लावल्याने चाकरमान्यांना या एसटीचा पाहिजे तितका फायदा झालेला नाही. कारण १३ ऑगस्टपासून एसटीने कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना कोरोना चाचणी अनिवार्य केली होती. त्यामुळे एसटीच्या नियोजनाचे तीन तेरा वाजले होते. मात्र, आता कोकणातून परतीच्या प्रवासासाठी येणार्‍या चाकरमान्यांनी एसटीला पंसती देत असल्याचं दिसून येत आहे. कारण सर्वसामान्य चाकरमान्यांना नेहमीच्या तिकीट दरांमध्ये सुरक्षित व सुखरूप घरी पोहोचविण्यात एसटीची या आगोदरपासून ओळख आहे. राज्य शासनाने घालून दिलेल्या कोविड-१९ च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत एसटीने प्रवासी वाहतूक केली आहे. मुंबईतील चाकरमान्यांनी कोकणातून येण्यासाठी एसटीच्या तब्बल ११४८ बस आरक्षित केल्या असून त्यापैकी ३४६ बसेसचे गट आरक्षण झाले आहे, तर ३६६ बसेसचे व्यक्तिगत आरक्षण फुल्ल झाले आहे. याबरोबरच उर्वरित ४३६ बसेस ह्या अंशतः आरक्षित झालेल्या आहेत.

First Published on: August 24, 2020 8:25 PM
Exit mobile version