ऑनलाईनमुळे शैक्षणिक साहित्य खरेदी ठप्प

ऑनलाईनमुळे शैक्षणिक साहित्य खरेदी ठप्प

जून महिना उजाडला की विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याचे वेध लागतात. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने नव्या इयत्तेची पाठ्यपुस्तके, वह्या लेखन साहित्यासह दप्तर, डबा, पाण्याची बॉटल यांसारख्या सर्वच वस्तूंच्या खरेदीसाठी शहरापासून ते खेड्यापर्यंत, विद्यार्थ्यांसह पालकांची लगबग सुरू होते. मात्र, कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षापासून शिक्षण व्यवस्थेचे पूर्ण स्वरूपच बदलून गेले आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला पालकांसह विद्यार्थ्यांची शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी मोठी झुंबड उडते. परंतु गेल्या वर्षीपासून शाळा महाविद्यालयांसह बाजारपेठही ठप्प झाल्या होत्या. डिसेंबर अखेरीस कोरोना विषाणूची रुग्णसंख्या कमी होत असल्याने पुढील शैक्षणिक वर्ष सुरळीत जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, या वर्षाच्या फेब्रुवारी अखेरीपासून कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने पुन्हा जनजीवन विस्कळीत केले. त्यामुळे सगळ्याच गोष्टींवर निर्बंध येऊन बाजारपेठही ठप्प झाल्या. त्यामुळे शाळा – महाविद्यालयांचाही खोळंबा झाला. आणि विद्यार्थ्यांना ऑनलाईनचे धडे मिळू लागले. त्यामुळे शैक्षणिक साहित्य खरेदी आपोआपच रोडावली. याचा मोठा फटका शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांना बसला.

…म्हणून खरेदीकडे पाठ
शाळा सुरू होण्याच्या आशेवर मागील इयत्तेचे संपूर्ण शैक्षणिक वर्षे ऑनलाईन शिक्षणात गेले. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने यंदाचे वर्षदेखील असेच सरेल या विचाराने ग्राहक शालेय वस्तूंच्या खरेदीकडे पाठ फिरवताना दिसत आहेत.

असा झाला परिणाम
ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे लेखन कमी झाले आहे. दरवर्षी दोन ते तीन डझन वह्या खरेदी करणारे ग्राहक यंदा केवळ अर्धा किंवा एक डझन वह्या खरेदी करत आहेत. नवीन पाठ्यपुस्तक खरेदी करणार्‍या ग्राहकांमध्ये देखील घट झाली असून अभ्यासक्रम न बदलल्याने वापरलेली जुनी पुस्तके अर्ध्या किमतीत खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा आहे.

लॉकडाऊनमुळे ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. पण, ग्रामीण आदिवासी भागात नेटवर्कअभावी व महागड्या फोन आणि रिचार्जमुळे ही संकल्पना फोल ठरली. त्यामुळे ग्रामीण भागात शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला. परिणामी शैक्षणिक साहित्य खरेदीवर परिणाम होऊन विक्रेत्यांना मोठा तोटा सहन करावा लागत असून खूप मोठे नुकसान सहन करावा लागत आहे.
– हनुमंत शिद, स्टेशनरी विक्रेता, खोडाळा

गेल्यावर्षी शाळा सुरू झाल्या नाहीत. थेट पुढील वर्गात प्रवेश मिळाला. त्यामुळे गेल्यावर्षी घेतलेले शैक्षणिक साहित्य व स्टेशनरी अद्याप तशीच शिल्लक असल्याने नवीन गोष्टी खरेदी करण्याची गरजच नाही. आणि तसेही ऑनलाईन शिक्षण असल्याने स्टेशनरीचा उपयोग होत नाही.
– सिद्धांत रोकडे, विद्यार्थी, देवगांव

First Published on: July 3, 2021 4:30 AM
Exit mobile version