वर्षभर अभ्यास केलेल्या विषयांचीच होणार परीक्षा; बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

वर्षभर अभ्यास केलेल्या विषयांचीच होणार परीक्षा; बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

बारावीच्या अभ्यासक्रमातून वगळलेले विषय दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिकवले जात होते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेचा अर्ज भरताना शेवटच्या क्षणी विद्यार्थ्यांना विषय बदलण्यास सांगण्यात येत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड अडचण होत होती. ही बाब लक्षात घेत शालेय शिक्षण विभागाने अभ्यासक्रमातून रद्द झालेल्या विषयांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. या वर्षासाठीच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून वगळलेल्या विषयांची परीक्षा देण्याची परवानगी दिली आहे.

यंदाच्या वर्षापासून बारावीसाठी सुधारित विषय आणि मूल्यमापन योजना निश्चित केली आहे. यानुसार शाखानिहाय गट ए, बी, सी मध्ये विषयांची विभागणी केली आहे. त्यानुसार काही विषय अभ्यासक्रमातून रद्द केले आहेत. ८ ऑगस्ट २०१९ रोजी या विषयीचा अध्यादेश जारी केला होता. मात्र त्याला कोणतीही प्रसिद्धी न दिल्याने याची माहिती कनिष्ठ महाविद्यालये आणि शिक्षकांपर्यंत पोहोचलीच नाही. त्यामुळे अभ्यासक्रमातून वगळलेले विषय शिक्षक शिकवत होते. पण बारावीच्या परीक्षेचा अर्ज भरताना ते विषय अर्जामध्ये नसल्याने काय करायचे हा प्रश्न शाळा- महाविद्यालये, प्राचार्य- मुख्याध्यापक, शिक्षक-विद्यार्थी व पालकांना पडला होता. शिक्षणशास्त्र, सहकार, संरक्षण शास्त्र, इंग्रजी साहित्य, टंकलेखन व लघुलेखन इत्यादी विषयांबाबत या समस्या निर्माण झाल्या होत्या. कोरोनामुळे हैराण झालेल्या विद्यार्थ्यांसमोर ही नवीन समस्या निर्माण झाली होती. शेक्षणिक वर्ष वाया जाण्याची भिती निर्माण झाली होती. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना फक्त यंदाच्या वर्षापुरती जुन्या विषयांची परीक्षा देण्यास मान्यता दिली आहे.

जुन्या विषयांनुसार परीक्षा देण्याची सवलत केवळ यंदाच्या परीक्षेपुरती असून वर्ष २०२१-२२ पासून बारावीच्या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळणार नाही. महाविद्यालयांनीही बंद झालेल्या विषयांचे किंवा शाखेसाठी उपलब्ध नसलेल्या विषयांचे अध्यापन तातडीने बंद करावे अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. तसेच जुन्या विषयांची परीक्षा देणारे जे विद्यार्थी त्या विषयात किंवा अन्य विषयांत नापास होतील त्यांना पुन्हा तोच विषय घेऊन फेरपरीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.

या विषयाची परीक्षा विद्यार्थ्यांना देता येणार

अवेस्ता-पहलवी, सामान्यज्ञान, हिंदी उपयोजित, मराठी साहित्य, इंग्रजी साहित्य, स्टेनोग्राफी (इंग्रजी/मराठी), विज्ञान शाखेच्या ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षणशास्त्र विषय घेतला आहे त्यांनाही परीक्षा देण्याची मुभा.समाजशास्त्र, मानसशास्त्र, तर्कशास्त्र, सहकार, राज्यशास्त्र यांपैकी एका पेक्षा अधिक विषय निवडलेल्या विद्यार्थ्यांनाही यंदा परीक्षेची संधी मिळणार आहे.

First Published on: January 18, 2021 8:05 PM
Exit mobile version