विधानसभा सुरू होताच विरोधकांचा गोंधळ, काम होऊ देईनात!

विधानसभा सुरू होताच विरोधकांचा गोंधळ, काम होऊ देईनात!

विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं हे पहिलंच पूर्णवेळ अधिवेशन आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठून अडचणीत आणण्याची आणि हल्ला चढवण्याची तयारी विरोधकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी पहिल्याच दिवशी विधानभवनात पायऱ्यांवर घोषणाबाजी करत विरोधकांनी अधिवेशनात पुढे काय वाढून ठेवलं आहे, याची चुणूक दाखवली. त्याचप्रमाणे आज दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी विरोधाचा सूर सुरूच ठेवला. विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांनी गदारोळ सुरू केला. प्रश्नोत्तराच्या तासात विरोधकांनी गोंधळ घालून कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.

प्रश्नोत्तराच्या तासात विरोधकांचा गदारोळ

शेतकऱ्यांना आश्वासन दिलेली संपूर्ण कर्जमाफी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे, पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत आणि त्यासोबत राज्यात महिलांवरील वाढते अत्याचार या मागण्या करत विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. पहिल्या अर्धा ते पाऊण तासात विरोधकांनी गदारोळ घातल्यानंतर अखेर सभापतींनी कामकाद १५ मिनिटांसाठी तहकूब केलं. आपल्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षांनी स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी केली. मात्र, ५ मार्च रोजी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर विशेष चर्चा आयोजित केली असल्याचं सांगून देखील विरोधकांचं समाधान झालं नाही. त्यामुळे विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिला. या पार्श्वभूमीवर कामकाज तहकूब करण्यात आलं.

भाजप प्रत्येक तालुक्यात आंदोलन करणार

दरम्यान, कामकाज सुरू होण्याआधी ‘महानगर’च्या टीमने भाजप आमदार आशिष शेलार यांच्याशी बातचित केली असता त्यांनी सरकारवर परखड शब्दांत ताशेरे ओढले. ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी, हेक्टरी २५ हजारांची मदत या आश्वासनांचा सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना विसर पडला आहे. ते आम्ही लक्षात आणून देणार आहोत. सरकारची बुद्धी शेतकरी आणि महिलांवरच्या अत्याचारांच्या दृष्टीने भ्रष्ट झाली आहे. त्या सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी प्रत्येक तालुक्यात आम्ही आंदोलन करणार आहोत’, असं आशिष शेलार म्हणाले.

First Published on: February 25, 2020 12:01 PM
Exit mobile version