मुंबईत तिसरं अवयवदान, दोघांना जीवनदान!

मुंबईत तिसरं अवयवदान, दोघांना जीवनदान!

कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल

नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अवयवदानाची संख्या वाढत असून गुरुवारी एका ५७ वर्षीय पुरुषाचे अवयवदान करण्यात आले आहेत. या व्यक्तीचे यकृत तसेच मूत्रपिंड दान करण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबियांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे इतर दोन रुग्णांना जीवदान मिळाले आहे. गुरुवारी झालेले अवयवदान हे यावर्षीचे तिसरे अवयवदान आहे.

नातेवाईकांचा त्वरीत निर्णय आला कामी!

पार्ल्यात राहणाऱ्या एका व्यावसायिकाला हायपरटेन्शनमुळे ब्रेन हॅमरेज झाले होते. त्यांना धीरुबाई अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी तिथे त्यांना ब्रेनडेड घोषित केले. मुख्य म्हणजे रूग्णाच्या नातेवाईकांनी तातडीने अवयवदान करण्याची तयारी दर्शवली आणि त्यांचे अवयवदान करण्यात आले. त्यानुसार रूग्णाचं यकृत आणि एक किडनी दान करण्यात आली.

याविषयी अधिक माहिती देताना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालयाच्या प्रत्यारोपण समन्वयक रेखा बारोत यांनी सांगितलं की, “या रुग्णाचं यकृत आणि एक किडनी दान करण्यात आली आहे. तर, दुसरी किडनी क्रियाशील नसल्याने रद्द करण्यात आली. दोन्ही अवयव कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील रुग्णांना दान करण्यात आले आहेत. अवयवदानासाठी रुग्णाच्या कुटुंबियांनी उत्तमरित्या सहकार्य केलं.”

First Published on: January 14, 2019 7:23 AM
Exit mobile version