‘पार्टी (नहीं) चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग’! मुंबई पोलिसांचे ट्विट

‘पार्टी (नहीं) चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग’! मुंबई पोलिसांचे ट्विट

कोरोना नियंत्रणात येण्याच्या वाटेवर असतानाच आता पुन्हा एकदा एका नव्या कोरोना व्हायरसने डोकं वर काढले आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला आहे. यापार्श्वभूमीवर भारतातही सतर्क राहण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. तर राज्यात आजपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून पब, बार क्लब आणि रेस्टॉरंट चालकांना कडक सूचना दिलेल्या असतानाही मुंबईत एका क्लबमध्ये कोविडच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येत्या ३१ डिसेंबरला बाहेर जाऊन सेलिब्रेशनची तयारी करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी सूचक इशारा दिला आहे.

मध्यरात्री करण्यात आली कारवाई

मुंबईतील विमानतळाजवळ असलेल्या ड्रॅगन फ्लाय क्लबवर सहार पोलिसांकडून मध्यरात्री २.३० वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्यचा माहितीनुसार, ‘माजी भारतीय क्रिकेटर आणि इतर काही सेलिब्रेटींसोबत एकूण ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन न केल्याने तसेच वेळमर्यादा संपल्यानंतरही क्लब सुरु ठेवण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली’, असे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, या घटनेचा संदर्भ देत मुंबई पोलिसांनी ट्विट करत रात्री उशिरापर्यंत पार्टी न करण्याबद्दल आधीच इशारा दिला आहे. ‘पार्टी (नहीं) चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग!’, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

२२ डिसेंबरपासून संचारबंदी

राज्यातील मुंबई, ठाणे, नाशिक अशा महापालिका क्षेत्रात २२ डिसेंबरपासून रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. २२ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत हा कर्फ्यू लागू असणार आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार (स्ट्रेन) आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्र्यांनी खबरदारीच्या उपाययोजनांची एक बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.


हेही वाचा – भाजपची उद्योग आघाडी शिवसेनेत


 

First Published on: December 22, 2020 5:49 PM
Exit mobile version