अजय देवगणचा सिनेमा पाहून त्याने केला फिल्मी स्टाईल खून!

अजय देवगणचा सिनेमा पाहून त्याने केला फिल्मी स्टाईल खून!

अजय देवगणचा सिनेमा पाहून त्याने केला मर्डर!

मुंबईच्या घाटकोपरमधून काही दिवसांपूर्वी उदयभान पाल ही ३५ वर्षीय व्यक्ती अचानक गायब झाली होती. त्यासंदर्भात पाल यांच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी पार कर्नाटकपर्यंतचा भाग पिंजून काढला. पण त्यांचा पत्ता लागला नाही. शेवटी त्यांची हत्या झाल्याचं तपासात निष्पन्न झालं. आणि हल्ल्याची पद्धत ऐकून तर पोलिसही अवाक् झाले! अभिनेता अजय देवगणचा एक सिनेमा पाहून हत्या करण्याचा सगळा प्लॅन आखल्याचं या आरोपीने कबूल देखील केलं! मांडूळ तस्करीच्या व्यवहारामध्ये ही हत्या झाल्याचं चौकशीतून समोर आलं आहे.

फक्त मोबाईल कंटेनरमध्ये फिरत राहिला!

उदयभान पाल बेपत्ता झाल्यानंतर १७ जून रोजी पोलिसांनी तपास सुरू केला. आधी त्यांचा मोबाईल ट्रेस केला. तर तो मोबाईल आधी कराड, नंतर कोल्हापूर, नंतर कर्नाटकमधलं सोंदत्ती, मग अगरगट्टी आणि नंतर आसपासच्या भागात फिरल्याचं लक्षात आलं. त्यानुसार पोलिसांनी हा प्रत्येक परिसर पिंजून काढला. मात्र, उदयभान पाल यांचा पत्ता लागला नाही. पुढे दोन आठवड्यांनंतर हाच मोबाईल एका वेगळ्याच सीमकार्डवर चालू करण्यात आल्याचं पोलिसांना समजलं. त्यानुसार पोलिसांनी कळंबोलीतून सीमकार्डधारक व्यक्तीला ताब्यात घेतलं. त्या व्यक्तीने तो मोबाईल एका कंटेनर चालकाकडून घेतला होता. आणि त्या चालकाला हा मोबाईल त्याच्याच कंटेनरमध्ये सापडला होता! तिथेच पोलिसांना आपण फसवले गेलो असल्याचं समजलं. त्यानंतर पोलिसांना प्रदीप सुर्वे नामक व्यक्ती आणि पालमधल्या भांडणाबद्दल समजलं. सुर्वेला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चौकशीतून त्यानेच ही हत्या केल्याचं कबूल केलं. अजय देवगणचा ‘दृश्यम’ हा सिनेमा पाहून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्लॅन केल्याचं त्याने सांगितलं आणि पोलिसही अवाक् झाले.


हेही वाचा – बीडमध्ये ३०० रुपयांच्या हिशेबावरुन वाद; पत्नीची हत्या

असा ठरला सिनेमावरून ‘मास्टर प्लॅन’!

वास्तविक उदयभान पाल हा मांडूळ तस्कर होता. सुर्वेने त्याच्याकडून १९ लाख रुपयांना एक मांडूळ विकत घेतलं होतं. मात्र, ते मांडूळ लगेच मृत झालं. त्यामुळे आपण फसवले गेलो असल्याची भावना प्रदीप सुर्वेची झाली. त्यातून सुर्वेनं पालला कराडला भेटायला बोलवलं. तिथे त्यानं केलेल्या मारहाणीत उदयभान पालचा मृत्यू झाला. पण ही हत्या लपवण्यासाठी त्याने अजय देवगणच्या ‘दृश्यम’ सिनेमामध्ये दाखवलेली शक्कल वापरली. त्याने उदयभानची ओळख पटू नये म्हणून आधी त्याचे केस आणि दाढी कापली. नंतर त्याचा मृतदेह खोल दरीत टाकला. त्यानंतर त्याचा मोबाईल एका कंटेनरमध्ये टाकला. त्यानंतर हा कंटेनर जिथे जिथे जाईल, तिथे पोलिसांना उदयभान पालचं लोकेशन दिसून आलं आणि पोलिसांना गुंगारा देण्यात तो यशस्वी ठरला!

First Published on: August 8, 2019 12:19 PM
Exit mobile version