प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाच्या वापरास बंदी

प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाच्या वापरास बंदी

प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाच्या वापरास बंदी

स्वातंत्र्यदिनी प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. तसेच ध्वजवंदनानंतर खराब झालेले, फाटलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय समित्यांकडे सुपूर्द करावेत, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर यांनी केले आहे. गृह विभागाने २२ एप्रिल २०१५ रोजी याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. दरवर्षी स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा सामन्यांच्या वेळी राष्ट्रप्रेम दाखविण्यासाठी नागरिकांकडून कागदाच्या आणि प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. मात्र, हा कार्यक्रम पार पडल्यानंतर फाटलेले कागदी राष्ट्रध्वज तसेच प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात, असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. त्यामुळे खराब झालेले राष्ट्रध्वजाचा अवमान न करता तो राष्ट्रध्वज प्रशासनाकडे सुपूर्द करावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आवाहन

खराब झालेले, फाटलेले राष्ट्रध्वज वापरानंतर त्याचा योग्य तो मान राखून ते ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार सन्मानपूर्वक नष्ट करणे आवश्यक असते. त्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरावर एक आणि अंधेरी, बोरिवली तसेच कुर्ला (मुलुंड) या तीन तालुक्यांसाठी तालुकास्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. खराब झालेले, फाटलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय समित्यांकडे सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था (एनजीओ) तसेच इतर संघटनांना देण्यात आलेले आहेत. नागरिकांनीही, असे राष्ट्रध्वज एनजीओ किंवा इतर संघटनांकडे सुपूर्द करावेत. या एनजीओ किंवा इतर संघटनांनी, असे राष्ट्रध्वज तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय समित्यांकडे सुपूर्द करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.


हेही वाचा – यंदा १५ ऑगस्टला बियांचा झेंडा!


 

First Published on: August 14, 2019 9:15 PM
Exit mobile version