हॉटेल व्यावसायिकाला बेदम मारहाण केल्याचा पोलिसांवरच आरोप

हॉटेल व्यावसायिकाला बेदम मारहाण केल्याचा पोलिसांवरच आरोप

मारहाण झालेला युवक

उल्हासनगर येथील नाईंटी डेज बियर बारजवळ एका हॉटेल व्यावसायिकाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. हितेश रमेशलाल असरानी (वय ३३) हा हॉटेल व्यावसायिक उल्हासनगर – ४ येथील बंगलो एरिया या परिसरात राहतो. त्याचे नेहरू चौक येथे रमेश कोल्ड्रिंस अँड हॉटेल हे दुकान आहे. २२ मार्च २०१९ रोजी रात्रीच्या सुमारास तो उल्हासनगर – ४ येथील श्रीराम चौकजवळ असलेल्या “नाईंटी डेज बियर बार” मध्ये बियर पिण्यासाठी गेला होता. रात्री १ वाजताच्या सुमारास तो बार मधून त्याच्या ड्रायव्हर सोबत बाहेर पडला असता त्याने बेकायदेशीर रित्या चॉपर बाळगल्याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस कॉन्स्टेबल हरेश्वर विठ्ठल चव्हाण यांनी हितेशवर गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण

मात्र या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. हितेशच्या म्हणण्यानुसार तो बारमधून खाली उतरत असताना दोन व्यक्तींनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली होती. यावेळी हितेशने स्वतःचा बचाव करण्यासाठी त्या व्यक्तींवर हात उगारला होता. हा प्रकार सुरु असताना रस्त्यावर उभे असलेले पोलीस कर्मचारी राहुल काळे आणि इतर दोन पोलिसांनी हितेशला ताब्यात घेऊन पोलिसांवर हात उगारतो का, असे म्हणत बेदम मारहाण करून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलीस ठाण्यात देखील बेंचवर झोपवून पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप हितेशने केला आहे. दरम्यान, हितेशच्या ड्रायव्हरने हा प्रकार त्याच्या घरच्यांना सांगितला असता हितेशचे आई – वडील पोलीस ठाण्यात आले. त्यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आल्याचाही आरोप हितेशने केला असून याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे.

सोशल मीडियावर प्रकरण व्हायरल

या संदर्भात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांना विचारले असता ते म्हणाले की, माझ्याकडे हितेश असरानी याने अद्याप तक्रार केलेली नाही. सोशल मीडियावर यासंबंधी हितेशने आपले म्हणणे मांडल्याचे आम्ही पहिले आहे. यावरून या प्रकरणाचा तपास सुरु केला असून जर कोणी पोलीस कर्मचारी दोषी आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.

First Published on: March 28, 2019 7:41 PM
Exit mobile version