निवडणुकीवरून राजकारण शिगेला; पालिका निवडणूक विभागाचे काम चालू

निवडणुकीवरून राजकारण शिगेला; पालिका निवडणूक विभागाचे काम चालू

मुंबई : महापालिकेसह २० महापालिकांच्या निवडणुका कधी होणार याचे वेध माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार, राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना लागले आहेत. त्यातच सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातील सुनावणी बुधवारी न होता पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता निवडणूक तारीख केव्हा जाहीर होईल, निवडणूक नेमकी केव्हा होईल हे निश्चित नसले तरी मुंबई महापालिका निवडणूक विभागाची पूर्व तयारी जोरात सुरू आहे. (Politics learned from elections However the work of the municipal election department continues)

निवडणूक विभाग निवडणूक मतदानाच्या दिवशी प्रत्येक बुथसाठी एक – दोन ‘स्टँप पॅड’ ची म्हणजे अंदाजे १२ – १५ हजार स्टँप पॅडची खरेदी करणार आहे. त्यासाठी टेंडर प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक वास्तविक ७ मार्च २०२२ रोजी संपली आहे.

तत्पूर्वी महापालिकेची निवडणूक होऊन नवीन महापालिका गठीत होणे आवश्यक होते. तसेच, नवीन महापौरही निवडणुकीनंतर निवडला गेला पाहिजे. मात्र ओबीसी आरक्षण व अन्य कारणास्तव मुंबई महापालिकेसह २० महापालिकांच्या निवडणुका मुदत संपून १ – २ वर्षे उलटत आली तरी घेण्यात आलेल्या नाहीत.

सर्वोच्च न्यायालयाने तर ओबीसी आरक्षणाशिवाय जेथे पावसाचे प्रमाण कमी आहे, तेथे निवडणूक घेण्याबाबत फर्मावले होते. मात्र राज्यात झालेला राजकीय भूकंप, त्यानंतर झालेले सत्तांतर व शिवसेनेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गट यांच्यातील सत्ता संघर्षाचा तिढा वाढला व वाद विकोपाला जाऊन अखेर सर्वोच्च न्यायालयात गेला आहे.

खरा शिवसेना पक्ष कोणता, धनुष्यबाण निशाणी कोणाची याबाबतचा तिढा आता सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्रीय निवडणूक खात्याकडे गेला आहे. त्यावर आता लवकरच निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर बुधवारी महापालिका निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी न होता पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील ही सर्व न्यायालयीन प्रक्रिया, तापलेले राजकारण ह्या परिस्थितीत मुंबई महापालिका निवडणूक विभागाने निवडणूक कामासाठी आवश्यक स्टेशनरी सामानाची खरेदी सुरू केली आहे.

मुंबईत निवडणुकीला किमान ९ हजार मतदान बूथची व्यवस्था करण्यात येते. एक बुथवर किमान एक व काही अडचण आल्यास पर्याय म्हणून आणखीन एक असे दोन “स्टँप पॅड” ची व्यवस्था करण्यात येते. या स्टँप पॅडचा वापर ज्या मतदारांना सही करणे शक्य नसते त्या अंगठे बहाद्दर मतदारांना स्टँप पॅडचा वापर करता यावा आणि मतदान अधिकारी यांना मतदान अहवाल तयार करताना विविध शिक्के कागदावर मारावे लागत असल्याने त्यासाठी स्टँप पॅड चा वापर करावा लागत असल्याने किमान १२- १५ हजार स्टँप पॅडची खरेदी करण्यात येणार आहेत.

त्यासाठीच पालिका निवडणूक विभाग स्टँप पॅडची खरेदी करणार आहे. त्यामुळे जेव्हा निवडणूक तारीख जाहीर होईल त्यावेळी पालिका निवडणूक विभाग तात्काळ कामाला लागणार आहे. त्यामुळे निवडणूक लवकर घेण्यास मदत होणार आहे.


हेही वाचा – ज्ञानवापी प्रकरण : वाराणसी न्यायालयातील सुनावणी पूर्ण, हिंदूंच्या अर्जावर ७ ऑक्टोबरला होणार निर्णय

First Published on: September 29, 2022 8:57 PM
Exit mobile version