राज्यात गर्भवतींमध्ये एचआयव्ही होण्याचे प्रमाण घटले

राज्यात गर्भवतींमध्ये एचआयव्ही होण्याचे प्रमाण घटले

जनजागृती मोहिमेचा सकारात्मक परिणाम

एचआयव्ही हा सर्वात जास्त लैंगिक संक्रमणातून होणारा आजार आहे. त्यातून झालेल्या गर्भधारणेतून हा आजार बाळालाही होऊ शकतो. त्यामुळे, मातेपासून बाळाला एचआयव्हीचा संसर्ग होऊ नये आणि हे प्रमाण कमी करता यावे यासाठी गर्भवती मातेच्या गर्भधारणेनंतर चाचण्या केल्या जातात. पालिका आणि सरकारी हॉस्पिटल्समध्ये प्रसूतीसाठी येणार्‍या गर्भवती महिलांची संख्या जास्त आहे. पण, त्या मातेपासून बाळाला एचआयव्हीचा संसर्ग होण्याचे प्रमाण घटले असल्याचे समोर आले आहे.

‘महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी’कडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या ३ वर्षांत महाराष्ट्रात २ हजार ५०९ गर्भवती महिलांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पण, गर्भवतीपासून बाळाला एचआयव्ही होऊ नये, यासाठी ‘प्रिव्हेंशन ऑफ पॅरेंट्स टू चाईल्ड ट्रान्समिशन ऑफ एचआयव्ही’ (पीपीटीसीटी) चाचणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गर्भवती महिलांच्या एचआयव्ही तपासणीचे प्रमाण वाढते आहे आणि गर्भवती महिलांमध्ये एचआयव्ही होण्याचे प्रमाण कमी होत आहे. गेल्या ३ वर्षांच्या आकडेवारीनुसार, २०१६-१७ या वर्षात २० लाख ३७ हजार ८४५ गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली होती. त्यातील ९५९ गर्भवतींना एचआयव्हीचा संसर्ग असल्याचे निदान झाले. २०१७-१८ या वर्षांत २२ लाख २ हजार ८२० गर्भवतींची चाचणी केली असता ९३५ गर्भवती महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्या. तर, २०१८ च्या डिसेंबरपर्यंत १६ लाख ५५ हजार ४६६ गर्भवतींची तपासणी करण्यात आली होती. यात ६१५ जणांना एचआयव्हीची लागण झाली होती.

गर्भवती महिलांच्या एचआयव्ही तपासणी आणि निदानाचे प्रमाण वाढले असून, एचआयव्हीग्रस्त महिलांचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी एचआयव्हीग्रस्त गर्भवती महिलांचे प्रमाण ०.०४६ टक्क्यांवरून ०.०३७ टक्क्यांवर आले आहे. शिवाय, १६ लाख ५५ हजार ४६६ गर्भवती महिलांची तपासणी केली गेली आहे.
– तुकाराम मुंढे,
प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी

First Published on: January 30, 2019 6:12 PM
Exit mobile version