मुंबई महापालिकेकडून तरुण उद्योजकांद्वारे निर्मित वस्तू आणि उपकरणांना प्रोत्साहन

मुंबई महापालिकेकडून तरुण उद्योजकांद्वारे निर्मित वस्तू आणि उपकरणांना प्रोत्साहन

मुंबई महापालिका

महापालिकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सोसायटीफॉर मुंबई इनक्यूबेशन लॅब टू आंत्रप्रेन्योरशिप (स्माईल) कॉन्सिल बिझनेस इनक्युबेशन सेंटर ही सुविधा सुरू केली आहे. या केंद्राच्या माध्यमातून नव उद्योजकांनी संशोधित केलेल्या वस्तू, उपकरणे, तंत्रज्ञानाचा वापर पालिकेच्या रुग्णालये, इतर विभागांमध्ये करणे, त्यातून नागरी पायाभूत सुविधा अधिक मजबूत करणे आणि त्यासोबतच या नव उद्योजकांना भरारी घेण्यासाठी सहाय्य करणे, हा स्माईल उपक्रमाचा हेतू आहे. यासंदर्भातील माहिती पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिली आहे.

स्माईल कौन्सिलच्या संचालक मंडळाची बैठक पालिका मुख्यालयातील आयुक्त सभागृहात सोमवारी पार पडली. याप्रसंगी अध्यक्षस्थानी पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल हे होते. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, सहआयुक्त (दक्षता) अजीत कुंभार, उपआयुक्त (सुधार) केशव उबाळे, प्रमुख – व्यवसाय विकास शशी बाला व इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

महापालिकेने प्रोत्साहित केलेल्या नव उद्यमींच्या पहिल्या तुकडीची नावीण्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे पालिकेच्या रुग्णालयांमध्ये वापरासाठी आता उपलब्ध झाली आहेत. स्माईल कौन्सिलच्या बैठकीत तीन नवउद्यमींची उपकरणे महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह यांच्याकडे प्रातिनिधीक स्वरुपात सोमवारी सुपूर्द केली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ही उपकरणे वैद्यकीय सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी मदत करणार असून सोबतच या नव उद्यमींना देखील त्यातून पाठबळ मिळेल, असा दावा पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह यांनी केला आहे.

पालिकेच्या संकल्पनेनुसार व पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे)आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोत्साहन देण्यात आलेली ५ नव उद्यमींची पहिली तुकडी ऑगस्ट २०२१ मध्ये सुरु करण्यात आली होती. या तुकडीने संशोधित केलेली उत्पादने व तंत्रज्ञान आता पालिकेकडे प्रायोगिक तत्वावर वापरण्यास उपलब्ध झाली आहेत.

नव उद्योजकांच्या पहिल्या तुकडीतील तीन उद्योजकांनी आपली नवसंशोधित अत्याधुनिक उपकरणे पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांना या बैठकीप्रसंगी प्रातिनिधीक स्वरुपात सुपूर्द केली. यामध्ये हेस्टॅक ऍनालिटिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिर्वण चॅटर्जी तसेच सहसंस्थापक गौरव श्रीवास्तव, अयाती डिव्हासेस प्रायव्हेट लिमिटेडचे व्यावसायिक विभाग प्रमुख पंकज इंचुलकर, आयू डिव्हायसेस प्रायव्हेट लिमिटेडचे विशेष सिन्हा यांनी आपापली नवसंशोधित उपकरणे पालिकेकडे सुपूर्द केली.

अत्याधुनिक उपकरणे व त्यांच्या उपयोगाबाबतची माहिती –

१) हेस्टॅक ऍनालिटिक्स प्रायव्हेट लिमिटेड –

सदर स्टार्ट-अप संसर्गजन्य रोगांसाठी विषाणुंच्या गुणसुत्रीय क्रमनिर्धारण (जीनोम सिक्वेंसिंग) विश्लेषणावर काम करत आहे. हा स्टार्ट अप महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत असून त्यामुळे आरोग्य सेवांचे निर्णय अधिक चोखपणे घेता येतील.

२) अयाती डिव्हायसेस प्रायव्हेट लिमिटेड –

या स्टार्टअपने एक नवीन न्यूरोथेरपी स्क्रीनर उपकरण विकसित केले आहे, जे ‘मधुमेहपूर्व’ टप्प्यात मधुमेहाच्या रुग्णांची लवकर तपासणी करण्यात मदत करते. जेणेकरून, मधुमेही रुग्णांच्या संदर्भात पाय विच्छेदनाची परिस्थिती टाळता येईल. या नावीण्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या २ उपकरणांचा पालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये प्रायोगिक तत्त्वावर उपयोग सुरु करण्यात आला आहे. यामुळे संभाव्य मधुमेही रुग्णांसाठी जलद व प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजना करण्यास आरोग्य विभागाला मदत होणार आहे.

३) आयू डिव्हासेस प्रायव्हेट लिमिटेड –

आयु डिव्हासेस यांनी ‘ब्लूटूथ सक्षम स्टेथोस्कोप’ हे नावीन्यपूर्ण उपकरण तयार केले आहे. पालिकेच्या वैद्यकीय मंडळींना रूग्णांचे निरीक्षण करण्यासाठी शरीराच्या इच्छित अवयवांवर स्टेथोस्कोप ठेवण्यास आणि संसर्गजन्य रोगांच्या बाबतीत सुरक्षित अंतर राखण्यास या आधुनिक उपकरणाची मदत होणार आहे. कारण, ब्ल्यूटूथ हेडफोनद्वारे डॉक्टरांना निरीक्षण ऐकण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे सदर उपकरण स्वयंचलितपणे प्रत्येक रुग्णाची माहिती मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे नोंदवते आणि संग्रहीत करते. परिणामी, हस्तलिखित नोंदींची गरज दूर होऊन वेळेची देखील बचत होते. या तंत्रज्ञानाची ७५ उपकरणे पालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये प्रायोगिक तत्त्वावर वापरासाठी उपलब्ध झाली आहेत.

First Published on: July 11, 2022 8:49 PM
Exit mobile version