सार्वजनिक उत्सवाच्या आडून उमेदवाराचा प्रचार

सार्वजनिक उत्सवाच्या आडून उमेदवाराचा प्रचार

जांभळी नाका येथील शिवाजी मैदानात सुरू असलेल्या नवरात्रौत्सवाचा आधार घेत ठाण्याचे लोकसभेचे उमेदवार आपला प्रचार करीत आहेत. प्रत्यक्षरित्या कोणत्याही प्रकारे होर्डिंग्स अथवा कटआऊट न लावता ते लेझरलाईटचा वापर करून हा प्रचार करीत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. जांभळी नाका येथील शिवाजी मैदानात सुरू असलेला हा नवरात्रौत्सव राजन विचारे यांचा असल्याचे ठाण्यातील प्रत्येकाला ठाऊक आहे. मात्र, यंदा निवडणुका आल्यामुळे विचारे यांना या उत्सवात प्रत्यक्ष सहभागी होता येत नाही. तसेच स्वतःच्या नावाचे बॅनर्स किंवा कटआऊट्सही लावता येत नाही. यामुळे आपल्या नावाचे लेझर लाईट बनवून ते समोरच्या इमारतीवर काही कालावधीच्या अंतराने दाखवण्याचे प्रयोजन केले आहे. प्रचाराची ही अनोखी अदा पाहून ठाणेकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाण्यात आनंद चॅरीटेबल ट्रस्टच्या नावाने स्वतःच्या अधिपत्याखाली चैत्र नवरात्रौत्सव सुरू केला. या नवरात्रौत्सवाचे यजमान खुद्द राजन विचारे आहेत. यंदाच्या निवडणुकीच्या काळात स्वतःचे कटआऊट किंवा नामोल्लेख केल्यास आचारसंहितेचा भंग होऊ शकतो किंवा मग निवडणुकीच्या एकंदरीत खर्चामध्ये हा खर्चही गणला जाऊ शकतो. मात्र, यावर उपाय म्हणून ही जबरदस्त कल्पना काही मंडळींनी शोधून काढली आहे. या सर्व कार्यक्रमाचे आयोजक विचारे आहेत, हे दाखवून देण्यासाठी त्यांनी लेझरलाईटचा वापर केला आहे. ही लेझरलाईट काही ठराविक काळातच सुरू होते आणि काही काळ पुन्हा बंद होते. शिवाजी मैदानाच्या उजव्या बाजूच्या इमारतीवर रात्रीच्यावेळी ही लेझरलाईट 15 ते 20 मिनीटांच्या फरकाने 5 मिनिटे सुरू राहते आणि बंद होते.

धार्मिक ठिकाणे किंवा पूजेची इतर ठिकाणे निवडणूक प्रचारासाठी म्हणून वापरण्यात येणार नाहीत. सामान्य नागरिकांच्या वैयक्तिक मालकीच्या जमिनीचा, घराचा, कंपाऊंडचा स्वतःचा राजकीय कार्यक्रम राबवण्यासाठी अनधिकृतरित्या वापर करू नये. यामध्ये पक्षाचा झेंडा फडकावणे, नेत्यांचे फोटो असलेले बॅनर लावणे, नोटीस चिकटवणे, घोषणा लिहिणे इत्यादींचा समावेश होतो. आदर्श आचारसंहितेची अशा तर्‍हेने नियमावली असतानाही विचारे जाणीवपूर्वक आचारसंहितेचा भंग करीत आहेत.
– प्रा.चंद्रभान आझाद, सामाजिक कार्यकर्ते, ठाणे

आतापर्यंत सुमारे १ हजार ७८४ बॅनर्स पोस्टर्सबाबत कारवाई करून ते काढण्यात आले आहेत. तसेच ४३ इमारतींवरून बॅनर्स, पोस्टर्स काढण्यात आले आहेत. आचारसंहिता भंग होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाकडून फ्लाईंग स्कॉडही नेमण्यात आले आहेत. यात पोलीस विभागाचाही सहभाग आहे. या स्कॉडच्या निदर्शनास अशी बाब आल्यास किंवा कोणी याविषयी तक्रार दाखल केल्यास कारवाई करण्यात येईल.
-अनिल पवार, निवडणूक निर्णय अधिकारी, ठाणे

First Published on: April 13, 2019 4:36 AM
Exit mobile version