‘मेंटल है क्या?’ चित्रपटाच्या नावाला मानसोपचार तज्ज्ञांचा विरोध

‘मेंटल है क्या?’ चित्रपटाच्या नावाला मानसोपचार तज्ज्ञांचा विरोध

'मेंटल है क्या?' चित्रपटाच्या नावाला मानसोपचारतज्ज्ञांचा विरोध

अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री कंगना रणौतचा चित्रपट ‘मेंटल है क्या’ प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाचे नाव आणि पोस्टरचा निषेध करत मुंबईसह देशातील काना-कोपऱ्यातील मानसोपचारतज्ज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनला (सीबीएफसी) पत्र लिहून चित्रपटाचे नाव बदलावे अशी मागणी केली आहे. ‘मेंटल है क्या’ हा चित्रपट येत्या २१ जूनला प्रदर्शित होणार आहे. पण, या चित्रपटाच्या नावाला मानसोपचारतज्ज्ञांनी विरोध दर्शवत एखाद्या चित्रपटाचे नाव अशा पद्धतीने असणे असंवेदनशील आहे, असे मानसोपचार तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

मानसिक रूग्णांची अवहेलना

या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर यासंबंधीत चर्चा सुरू झाली. चित्रपटाचे नाव बदलण्यासाठी डॉक्टरांनी सोशल मीडियावर मोहीम देखील सुरू केली आणि यासाठीच इंडियन सायकॅट्री सोसायटी (आईपीएस) कडून सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहिण्यात आले आहे. सोशल मीडियावर सुरू केलेल्या अभियाना अंतर्गत मानसिकरित्या आजारी असणाऱ्या रुग्णांची अवहेलना होत असल्याचा आरोप लावून चित्रपटाचे नाव बदलण्यासाठी दबाव टाकला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच यासाठी एक जनहित याचिका ही दाखल केली जाणार आहे.

पत्रात नमूद केलेले मुद्दे

“आजही देशात हजारो लोक असे आहेत जे मानसिक आजाराला आजार न समजता वेडेपणा समजतात. त्यामुळे यातील काही जण उपचारांसाठी ही पुढे येत नाही. आता कुठे लोक मानसिक आजाराला स्वीकारू लागले आहेत, याबाबत जनजागृती होते आहे. तर दुसरीकडे असे नाव एखाद्या चित्रपटाला देणे पटण्यासारखे नाही. त्यामुळे फक्त चित्रपटाचे नावच नाही तर पोस्टर ही बदलला पाहिजे. ‘मेंटल है क्या’ असे नाव कोणी कसे ठेऊ शकतो.”

–डॉ. हरिष शेट्टी, मानसोपचार तज्ज्ञ

मेंटल नावानी आत्मविश्वास कमी होते

भारतात २० पैकी एक जण मानसिक आजाराने ग्रस्त आहे. याशिवाय डिप्रेशन आणि आत्महत्या करण्याचे प्रमाणही वाढते आहे. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट स्म्रिती जोशी यांनी देखील आपले मत ट्विटरवर मांडले आहे. “ याच कारणासाठी मानसिक आरोग्यासंदर्भात समाजात असलेले गैरसमज दूर करणे फार गरजेचे आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवर असलेल्या ‘मेंटल है क्या’ या नावातून मानसिक आजाराबाबत असलेले चुकीचे समज पुढे येत आहेत.” तसेच इंडियन सायकॅट्रीस्ट सोसायटीच्या सदस्य आणि ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर यांनी सांगितले की, “या चित्रपटाचे पोस्टरच मुळात चुकीचे आहे. मेंटल हा शब्द एखाद्याला आपण चिडवण्याच्या हेतूने वापरतो. मानसिक आजार हा एखाद्याला अपमानास्पद वाटतो. डिप्रेशनवरील उपचार घेण्यासाठी लोक पुढे येत नाही. त्यामुळे, या पोस्टरवरुन गैरसमज पसरु शकतो. लोकांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा सर्वांनीच लक्षात घेणे गरजेचे आहे.”

First Published on: April 20, 2019 5:20 PM
Exit mobile version