ठाण्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

ठाण्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

प्रातिनिधीक फोटो

मुंबईतील डोंगरीत चार मजली धोकादायक इमारत कोसळून जीवितहानी झाल्याची घटना घडल्याने धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ठाणे शहरातही सुमारे साडेचार हजार धोकादायक इमारती असून यामध्ये लाखो रहिवाशी राहत आहेत. मुंबईच्या घटनेनंतर ठाण्यातील लाखो रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.

४ हजार ५०७ इमारती धोकादायक

ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ४ हजार ५०७ इमारती धोकादायक आहेत. यातील १०३ इमारती अत्यंत धोकादायक स्थितीत असून, त्यापैकी ८२ इमारती खाली करण्यात आल्या आहेत. तर ८ इमारती तोडण्यात आल्या आहेत. रिकामी करून संरचनात्मक दुरुस्तीची आवश्यकता असणाऱ्या ९८ इमारती, रिकामी न करता संरचनात्मक दुरुस्तीची गरज असलेल्या २ हजार २९७, तर किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता असलेल्या २हजार नऊ अशा या इमारती धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – Dongri Bulding Collapse : ‘डोंगरीची घटना सरकारच्या हलगर्जीपणामुळे घडली

तांत्रिक सल्लागार समिती स्थापन करणार

ठाण्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न विधीमंडळातही उपस्थित झाला होता. त्यावेळी नगरविकास राज्यमंत्री योगशे सागर यांनी ‘ठाणे शहरातील धोकादायक इमारतींसंदर्भात तज्ज्ञांकडून अहवाल मागविण्यात आले असल्याचे स्पष्ट केलं होतं. तसेच मुंबईप्रमाणेच ठाण्यातील धोकादायक इमारतींसाठीही तांत्रिक सल्लागार समिती स्थापन करण्याच्या सूचना देण्यात येतील’, असेही सांगितले होते. मात्र अजूनही प्रशासनाला समिती स्थापन करण्यात मुहूर्त सापडलेला दिसून येत नाही.

या इमारतींमधील वीज, पाणी कनेक्शन तोडणार

धोकादायक इमारतीचा वीज, पाणी कनेक्शन तोडण्याचा निर्णयही महापालिकेने घेतला आहे. धोकादायक इमारती अनेक वर्षांपासून पुनर्बांधकामाच्या प्रतिक्षेत आहेत. या इमारतींत राहणार्‍या नागरिकांची परवड पाहून धोकादायक इमारतीत राहणारे रहिवासी घरे सोडण्याऐवजी जीव मुठीत धरून जगणे पसंत करीत आहेत. त्यामुळे धोकादायक इमारतींमध्ये राहणार्‍या लाखो कुटुंबीयांच्या जीवाशी आपण अजून किती वर्षे खेळणार आहोत? असाच सवाल उपस्थित होत आहे.

First Published on: July 16, 2019 7:21 PM
Exit mobile version