राणीची बाग पर्यटकांनी पुन्हा गजबजली ; सहा महिन्यात चार कोटींचे उत्पन्न

राणीची बाग पर्यटकांनी पुन्हा गजबजली  ; सहा महिन्यात चार कोटींचे उत्पन्न

कोविडचा प्रभाव कमी असल्याने व लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने मुंबईची शान व जान असलेल्या भायखळा येथील राणीच्या बागेत ( वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय) पर्यटकांची गर्दी वाढत आहे. राणीच्या बागेत गेल्या १ नोव्हेंबर २०२१ पासून ते आजपर्यंत तब्बल १० लाख पर्यटकांनी भेट दिली आहे. त्यामुळे राणी बागेला ४ कोटी १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

राणीच्या बागेत सध्या दररोज ५ – ६ हजार पर्यटक भेटी देतात. तर दर रविवारी, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी राणी बागेत प्राणी व पक्षी बघायला तब्बल २० हजार किंवा त्यापेक्षाही जास्त पर्यटकांची गर्दी असते. यामध्ये बच्चे कंपनी, महिला यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे ज्या राणीच्या बागेला आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘ झू पार्क’ बनविण्यासाठी पालिका प्रशासन काही कोटी रुपये खर्च करतेय त्या तुलनेत राणी बागेला म्हणजेच पालिका प्रशासनालाही उत्पन्नाचे एक स्त्रोत उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पालिकेला एकदा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची परतफेड मिळत आहे. परिणामी भविष्यात पालिकेसाठी राणी बाग हे उत्पन्नाचे मोठे स्रोत म्हणून उदयाला येणार असल्याचे बोलले जात आहे.
यासंदर्भातील माहिती राणी बाग प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

गेल्या मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे केंद्राच्या आदेशाने राज्य सरकारने मुंबईत काही निर्बंध घातले होते. त्यामुळे प्रथमतः २३ मार्च २०२० पासून सुरक्षिततेच्या कारणास्तव राणी बाग बंद करण्यात आली. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला व राणी बागेचे बंद केलेले गेट पुन्हा १५ फेब्रुवारी २०२१ पासून उघडण्यात आले होते ; मात्र नंतर पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला व राणी बागेचे गेट ४ एप्रिल २०२१ पासून पुन्हा बंद करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा कोरोनावर नियंत्रण आल्याने व कोरोनाची तिसरी लाट रोखून धरण्यात पालिका आरोग्य यंत्रणेला यश आल्याने १ नोव्हेंबरपासून राणी बागेचे दरवाजे पर्यटकांसाठी उघडण्यात आले. मात्र १ नोव्हेंबर रोजी पहिल्याच दिवशी राणीच्या बागेत १ हजार ६२१ पर्यटकांनी भेट दिली होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी पालिकेच्या तिजोरीत ६८ हजार ७२५ रुपयांची कमाई जमा झाली होती. तर, १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत राणीच्या बागेत ५० हजार ७९६ पर्यटकांनी भेट देऊन प्राणिसंग्रहालयात पक्षी, पेंग्विन, प्राणी यांच्यासोबत आनंद लुटला. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत २१ लाख १८ हजार ३७५ रुपयांचे उत्पन्न जमा झाले होते.

First Published on: May 10, 2022 8:20 PM
Exit mobile version