योग्य सन्मान मिळत नसल्याने रिपाइंच्या गोटात नाराजी

योग्य सन्मान मिळत नसल्याने रिपाइंच्या गोटात नाराजी

ठाणे लोकसभा मतदार संघात मंगळवारी युतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या वचननामा प्रकाशन सोहळ्यात रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांना पाठच्या रांगेत बसावे लागल्याने रिपाइं कार्यकर्ते अतिशय नाराज झाले आहेत. या सोहळ्यात आमदार प्रताप सरनाईक, संजय केळकर, मंदा म्हात्रे, शिवसेना उपनेते अनंत तरे, जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, भाजप शहर अध्यक्ष अ‍ॅड. संदीप लेले, शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा, रिपाइंचे रामभाऊ तायडे आदी यावेळी उपस्थित होते. प्रोटोकॉलप्रमाणे ठाणे विभागीय अध्यक्षांना पुढील रांगेत स्थान देण्यात आले असताना रिपाइंच्या रामभाऊ तायडे यांना मात्र मागच्या रांगेत बसवण्यात आल्याने ठाण्यातील रिपब्लिकन कार्यकर्ते अस्वस्थ झाले. त्यांना जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त करून या सभेतून काढता पाय घेतला.

आमच्या पदाधिकाऱ्यांना दुय्यम स्थान दिले जाते. रिपाइंच्या कार्यकत्र्यांना केवळ वापरले जात आहे. तुमच्या पक्षाच्या लोकांना पदे दिली जातात, मात्र आमच्या कायकत्र्यांना साधे एसीओ पदही मिळत नाही. दलित वस्ती सुधार योजनेसाठी कोट्यवधी रूपयांचा निधी येतो. मात्र तो योग्य ठिकाणी वापरला जात नाही. तरीही आम्ही सहकार्य देतो. आम्हाला केवळ गृहीत वापरले जाते, याची खंत वाटते.
– अश्विन कांबळी, रिपब्लिकन कार्यकर्ते, ठाणे

कार्यकर्ते सभा अर्ध्यावर सोडून गेले

जाहीरनामा प्रकाशित होत असताना तायडे हे मागील रांगेत असल्याने ते छायाचित्रात येत नव्हते. अखेर सरनाईक यांनी त्यांना आवाज देऊन आपल्या बाजूला येण्याची विनंती केली. मात्र तायडे यांनी त्याच ठिकाणी राहून आपली नाराजी व्यक्त केली. हा सर्व प्रकार रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी याबद्दल तायडे यांना विचारणा केली. परंतु तायडे यांनी यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. त्यामुळे काही रिपाइं कार्यकर्ते सभा अर्ध्यावर सोडून निघून गेले. कल्याणमध्ये रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णा रोकडे यांनी भर मेळाव्यात शिवसेना भाजपचे दोन पालकमंत्री आणि पदाधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त करण्याचे प्रकरण ताजे असतानाच ठाण्यातही तोच प्रकार घडला असल्याने रिपाई कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

First Published on: April 24, 2019 7:36 PM
Exit mobile version