पक्षांतराबाबत पवारांसमोर बोलण्याचे धाडस नाही; सचिन अहिर यांची कबुली

पक्षांतराबाबत पवारांसमोर बोलण्याचे धाडस नाही; सचिन अहिर यांची कबुली

अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (एनसीपी) चा आणखी एक बडा नेता शिवसेनेच्या गळाला लागला. एनसीपीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेना पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब केला असून आज, गुरुवारी दुपारी ११ वाजता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते घड्याळ सोडून शिवबंधन बांधणार आहेत. याबाबतची माहिती स्वतः सचिन अहिर यांनी प्रसार माध्यमांना दिली असून एकीकडे आनंद तर दुसरीकडे दुःखाची भावना असल्याचेही अहिर म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी पक्षांतराबाबत बोलण्याचे धाडस नसल्याची कबुलीही सचिन अहिर यांनी दिली. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करण्याचा आनंद आणि पवारांना सोडण्याचं दुःख अशा दोन्ही भावना असल्याचे ते म्हणाले.

काय म्हणाले सचिन अहिर 

राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात. हा निर्णय घेताना त्रास झाला. मात्र शिवसेनेत प्रवेश करताना शिवसेनाप्रमुखांचं स्वप्न साकार करण्याची संधी मिळाली असल्याचे अहिर यांनी सांगितले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे शहराच्या विकासाची कामे करता येतील, असेही सचिन अहिर यांनी नमूद केले. पक्षप्रवेशासाठी सचिन अहिर आणि त्यांच्या पत्नी मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले आहेत.

राष्ट्रवादीला मोठा धक्का 

सचिन अहिर यांच्या शिवसेना पक्षातील प्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला फार मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सचिन अहिर यांचे मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, अहिर शिवसेना प्रवेशावर ठाम आहेत. अहिर यांनी गुरुवारी संध्याकाळी आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आपण राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे मत मांडले. यावेळी शिवसेनेचे प्रमुख नेतेही तिथे उपस्थित होते. त्यांनी देखील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

First Published on: July 25, 2019 10:51 AM
Exit mobile version