Sushant Singh Suicide : सेनेच्या युवा मंत्र्याचा हस्तक्षेप? भाजपच्या आरोपावर संजय राऊत म्हणतात…

Sushant Singh Suicide : सेनेच्या युवा मंत्र्याचा हस्तक्षेप? भाजपच्या आरोपावर संजय राऊत म्हणतात…

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावर गेल्या दोन दिवसांपासून वेगळंच राजकारण राज्यात घडताना पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजपकडून सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या (Sushant Singh Rajput Suicide Case) प्रकणात शिवसेनेच्या एका युवा नेत्याच्या दबावामुळे पोलिसांना तपास करता येत नसल्याचा आरोप केलेला असताना शिवसेनेचे मंत्री असलेल्या अनिल परब यांनी देखील सुशांतच्या घरी पार्टी झालीच कशी? त्याला कोण कोण उपस्थित होतं? याची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदरा संजय राऊत यांनी या आरोपांना उत्तर दिलं आहे. ‘भाजपने हवेत तीर मारू नयेत, नाव घेऊन बोलावं’, असं आव्हान संजय राऊतांनी दिलं आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपकडून याला काय उत्तर दिलं जातं, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

‘हवेत तीर चालवू नये’

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेल्या पाटण्याचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वारंटाईन केल्यानंतर त्या मुद्द्यावरून आता बिहारमधून देखील नाराजी व्यक्त होत आहे. त्यातच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ‘शिवसेनेच्या एका युवा मंत्र्याच्या दबावामुळे पोलिसांना निष्पक्ष तपास करता येत नाही’, असा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे शिवसेनेवर टीका होत असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यावर मत व्यक्त केलं आहे. ‘फक्त युवा मंत्री म्हणून टीका करणं चुकीचं आहे. त्यांनी नाव घेऊन बोलावं. त्यांनी हवेत चालवलेले तीर आम्ही मानत नाहीत. ही पब्लिक आहे आणि त्यांना सगळं माहितीये’, असं राऊत यावेळी म्हणाले.

‘त्या’ ट्वीटचा रोख कुणाकडे?

संजय राऊत यांनी आज सकाळी केलेल्या एका ट्वीटवरून राजकीय चर्चा सुरू झाली होती. त्यांच्या ट्वीटचा नक्की रोख कुणाकडे आहे, याविषयी तर्क लावले जात होते. मात्र, आपला रोख कुणाकडेही नव्हता, असं ते म्हणाले आहेत. ‘काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये, असा नियम आहे. हमाम में सब नंगे होते है. कुणी कुणाकडे बोट दाखवू नये. राजकारणात प्रत्येक जण काचेच्या घरात राहातो. माझ्या ट्वीटमध्ये कुणावर रोख नाही’, असं ते म्हणाले आहेत.

‘मुख्यमंत्री अयोध्येला जाणार नाहीत’

‘अयोध्येमध्ये आणि आसपास कोरोनाच्या संक्रमणाची परिस्थिती चिंताजनक आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील कोरोनाचा प्रभाव दिसून येत आहे. तिथल्या एका मंत्र्यांचं निधन देखील झालं आहे. त्यामुळे माझं म्हणणं आहे की तिथे कमीत कमी लोकांनी जायला हवं. पंतप्रधान तिथे जाणं महत्त्वाचं आहे. ते जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तिथे केव्हाही जातील. तिथले मुख्य पुजारी, सुरक्षारक्षक कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. उमा भारती तिथे जाणार आहेत पण कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. त्यामुळे निमंत्रणासाठी मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) थांबलेले नाहीत. पंतप्रधान स्वत: तिथे जात आहेत, त्यांना आमच्या शुभकामना आहेत’, असं म्हणत मुख्यमंत्री राम मंदिराच्या (Ayoddhya Ram Mandir) भूमिपूजनाला जाणार नसल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले. ‘आमंत्रणासाठी थांबायला हे काही लग्न नाही. देशात असलेल्या परिस्थितीमध्ये कमीत कमी व्हीआयपी लोकांनी तिथे जाणं गरजेचं आहे. आम्ही नंतर देखील तिथे जाऊ. पुन्हा पूजा करू’, असं ते म्हणाले.

First Published on: August 3, 2020 1:16 PM
Exit mobile version