हा तर देशाच्या लोकशाहीवर सामुहिक बलात्कार – संजय राऊत

हा तर देशाच्या लोकशाहीवर सामुहिक बलात्कार – संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत

हथरसमध्ये एका तरुणीवर सामुहिक बलात्कार झाल्याचं प्रकरण (Hathras Rape Case) देशभरात चर्चेत आलेलं असतानाच उत्तर प्रदेश पोलिसांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना दिलेली वागणूक देखील विरोधी पक्षांमध्ये असंतोष निर्माण करणारी ठरली आहे. दिल्लीहून हथरसच्या दिशेने पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या राहुल गांधींना दिल्ली-नोएडा महामार्गावर (DND Highway) रोखत धक्काबुक्की करण्यात आली. तसेच, या झटापटीत ते खाली देखील पडले. त्यावर देशभरातील विरोधी पक्षांनी टीका केलेली असतानाच ‘हा प्रकार म्हणजे देशाच्या लोकशाहीवरचा सामुहिक बलात्कार आहे’, अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

हथरस प्रकरणात राहुल गांधींना मिळालेल्या वागणुकीचा संजय राऊत यांनी यावेळी निषेध केला. ‘राहुल गांधी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत. ते इंदिरा गांधींचे नातू आणि राजीव गांधींचे पुत्र आहेत. या दोघांनी देशासाठी रक्त सांडलं आहे. आणि त्या राहुल गांधींसोबत जर अशा प्रकारची वागणूक होत असेल, तर इतिहास तुम्हाला माफ करणार नाही. ज्या प्रकारे राहुल गांधींसोबत उत्तर प्रदेशचे पोलीस वागत होते, ते चित्र कोणत्याही समाजाला, राजकारणाला शोभणारं नाही. राज्यातल्या एका मुलीवर बलात्कार झाल्याबद्दल विरोधी पक्षांनी आवाज उठवायचा नाही, ही कुठली दहशत आहे? राहुल गांधींना जर तुम्ही अशा प्रकारे खाली पाडत असाल, तर हा देशाच्या लोकशाहीवर सामुहिक बलात्कार आहे’, असं संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा – यूपीत नराधमांचा हैदोस; हाथरस नंतर बलरामपूर, भदोही येथेही बलात्कार

हथसरमध्ये एका तरुणीवर काही नराधमांनी सामुहिक बलात्कार झाल्यानंतर रुग्णालयात उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेश पोलिसांनी तिच्या मृतदेहावरही कुटुंबीयांना न सोपवता रात्रीच्या अंधारात अंत्यसंस्कार केले. त्यामुळे या मुद्द्यावरून मोठा वाद सुरू झाला. त्यातच राहुल गांधी यांना झालेली धक्काबुक्की आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांनाही झालेली धक्काबुक्की यामुळे वातावरण अधिकच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसकडून देशभरात या घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच, शिवसेनेकडूनही दुपारी ३ वाजता चर्चगेटजवळ आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शिवसेनेचे अनेक नेते सहभागी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

First Published on: October 2, 2020 10:34 AM
Exit mobile version