फी न भरल्याने विद्यार्थ्यांना शिक्षा; शाळेचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात

फी न भरल्याने विद्यार्थ्यांना शिक्षा; शाळेचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात

शाळेतील फी वाद पोलिसात

उल्हासनगर येथील गुरुनानक शाळेच्या तब्बल ८० विद्यार्थ्यांनी फी भरली नाही म्हणून त्यांना वर्गाबाहेर उभे राहण्याची शिक्षा फर्मावली होती. तसेच या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा रद्द करण्यात आली होती. या प्रकरणी संतप्त पालकांनी आणि मनसे पक्षाने शाळा प्रशासनाकडे तक्रार केली असता हा वाद शेवटी पोलीस ठाण्यात पोहचला. पोलिसांसमोर शाळा प्रशासनाने आपली चूक मान्य करून असा प्रकार पुन्हा घडणार नाही, असे आश्वासन दिले आहे.

पालकांनी मुख्याध्यापकांना जाब विचारला

गेल्या ४ दिवसांपूर्वी शहरातील कॅम्प नं. ४ येथील कुर्ला कॅम्प रोड येथे असणाऱ्या गुरूनानक शाळेतील इयत्ता ९ वीत शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी फी भरली नसल्यामुळे त्यांची तोंडी परिक्षा न घेता त्यांना वर्गाबाहेर उभे करून ठेवण्यात आले होते. आपल्याला परिक्षा देता न आल्याने चिंताग्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना हा प्रकार सांगताच त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे धाव घेऊन झालेल्या प्रकाराबाबत जाब विचारला. पण शाळेच्या प्रशासनाने त्यांना उडावाउडवीची उत्तरे देत पिटाळून लावल्यामुळे संताप्त पालकांनी अखेर मनसेकडे धाव घेतली. शाळेला जाब विचारण्यासाठी मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शाळेच्या ठिकाणी धाव घेतली पण तिथे १० वीची परिक्षा सुरू असल्याने आणि आचारसंहिता असल्यामुळे मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख, उपाध्यक्ष प्रदीप गोडसे, मुंबई विद्यापीठ अध्यक्ष संतोष धोतरे, विभाग अध्यक्ष प्रमोद पालकर, सुहास बनसोडे, बादशाहा शेख, गणेश आठवले, विकी जिप्सन, बाला आहिरे आणि इतर पदाधिकारी यांनी हा प्रकार विठ्ठलवाडी पोलिसांच्या कानावर घालताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी मनसेच्या शिष्टमंडळांना पोलीस ठाण्यात बोलावले.

पोलिसात केली तक्रार 

तसेच तक्रारदार पालक, शाळेचे मुख्याध्यापक, ट्रस्टी आणि शिक्षण मंडळाचे वरिष्ठ लिपिक गायकर या सर्वांना पोलीस ठाण्यात बोलावून घडलेल्या प्रकाराबाबत सर्वांचे मत जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित केली. त्यावेळी शाळेबाबत पालकांनी आपल्या तक्रारीचे मुद्दे मांडले. तर मनसेच्या शिष्टमंडळींनी शाळेबाबत येणाऱ्या वारंवार तक्रारीचा पाढा वाचला. यावेळी शाळेच्या प्रशासनाने आपली बाजू मांडून सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. अखेर सर्वांचे मत जाणून घेतल्यावर वरिष्ठ पोलीस निरिक्षक भामे यांनी बैठकीत उपस्थित असलेल्या सर्वांनाच मार्गदर्शन करीत काही सल्ले दिले. याशिवाय विद्यार्थ्यांवर असा प्रकार यापुढे घडून आणून देऊ नका शाळेच्या मुख्याध्यापकांकडे प्रथम तक्रार करा तिथे समाधान न झाल्यास ट्रस्टीकडे जा, तिथेही न्याय नाही मिळाला तर शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करून आपले प्रश्न सोडवा, असा सल्ला दिला.

First Published on: March 23, 2019 10:56 AM
Exit mobile version