युती, आघाडीनंतर आता वंचितच्या जागावाटपाच्या चर्चा

युती, आघाडीनंतर आता वंचितच्या जागावाटपाच्या चर्चा

ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर

सत्ताधारी भाजप-शिवसेना आणि विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यानंतर आता तिसऱ्या म्हणजेच वंचित बहुजन आघाडीतल्या घटकपक्षांमधल्या जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकांवेळी फक्त एकच जागा लढवणाऱ्या एमआयएम या घटकपक्षाने यंदा मात्र विधानसभेसाठी १०० जागांची मागणी केली आहे. यासंदर्भात भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम यांच्यामध्ये चर्चा सुरू असून एमआयएम आपल्या मागणीवर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, शनिवारी एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने याद्वारे विधानसभा निवडणुकांचं बिगुलच वाजवल्याचं सांगितलं जात आहे.

यंदाही काँग्रेसला वंचितचा फटका?

सध्या वंचित बहुजन आघाडीसाठी मराठवाड्यातील उमेदवारांच्या मुलाखती सध्या सुरू आहेत. सर्व लहान-मोठ्या जातींना एकत्र करून वंचितचा प्रयोग प्रकाश आंबेडकर यांनी सुरू केल्यानंतर त्यांच्या सभांना लोकसभा निवडणुकांदरम्यान मोठा प्रतिसाद मिळाला होता. निकाल लागल्यानंतर राज्यातल्या किमान ११ जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करण्यास वंचित बहुजन आघाडी कारणीभूत ठरल्याचं दिसून आलं. यात काँग्रेसच्या अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या काही दिग्गज नेत्यांचा देखील समावेश होता. त्यामुळे यंदा वंचित बहुजन आघाडीचा चांगलाच धसका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर वंचितने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत निवडणुकीत उतरावे यासाठी आघाडीतले नेते प्रयत्नशील असले, तरी वंचित मात्र त्या मनस्थितीत दिसत नाहीये. त्यामुळेच प्रकाश आंबेडकरांनीच काँग्रेस-राष्ट्रवादी दोघांना मिळून ४० जागा ‘सोडण्याचा’ प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकांमध्ये देखील वंचितचा काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसण्याची दाट शक्यता आहे.


वाचा सविस्तर – आता वंचितचा काँग्रेसला ४० जागांचा प्रस्ताव

लवकरच जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार!

दरम्यान, एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीच्या चर्चा आणि प्रस्ताव सुरू असतानाच आता एमआयएमनं देखील १०० जागांचा दावा केला आहे. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी या दोघांमध्ये यासंदर्भात चर्चा सुरू असून लवकरच दोन्ही पक्षांमधल्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेल, अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.

First Published on: July 29, 2019 9:11 AM
Exit mobile version