शेती विधेयकावरून सुरू असलेल्या वादावर शरद पवारांचा अन्नत्याग!

शेती विधेयकावरून सुरू असलेल्या वादावर शरद पवारांचा अन्नत्याग!

शरद पवार यांचा गंभीर आरोप

शेती बिलावरून रविवारी राज्यसभेत झालेल्या राड्यावर गेल्या २ दिवसांपासून मोठा गोंधळ सुरू आहे. त्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील खासदार शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी राज्यसभेत आक्रमक झालेल्या खासदारांची पाठराखण केली. तसेच, विधेयक पारित करण्यात सरकारकडून राबवण्यात आलेलं धोरण आणि खासदारांचं निलंबन याविरोधात खासदारांनी केलेल्या आंदोलनात मीही सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे, असं शरद पवारांनी जाहीर केलं. तसेच, ‘ज्या बिलावर ३ ते ४ दिवस चर्चा होणं आवश्यक होतं, ते बिल रेटून नेण्याचा प्रयत्न असल्याचं दिसत होतं. हे बिल सत्ताधाऱ्यांकडून तातडीने मंजूर करून घेण्याचा आग्रह होता. त्यावर सदस्यांची मतं विचारात घेतली गेली नाहीत, मतं मांडण्याची संधी सदस्यांना देण्यात आली नाही’, असं देखील शरद पवार यावेळी म्हणाले.

आज सकाळीच राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून कृषी बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यामुळे मानसिक त्रास झाला आहे अशी तक्रार केली होती. तसेच, ‘राज्यसभेत सदस्यांनी लोकशाहीचं अवमूल्यन करणारी कृती केली आहे. त्यामुळे मी व्यथित झालो आहे. मला रात्रभर झोप लागली नाही. त्यामुळे आज दिवसभर मी उपोषण करत आहे’, असं देखील या पत्रात त्यांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, ‘राज्यसभेत मांडलेल्या विधेयकावर काही सदस्यांना आपली भूमिका मांडायची होती, मतं द्यायची होती. मात्र, त्यांना ती संधी न देता विधेयक पुढे रेटून नेलं. उपसभापतींची ही कृतीच लोकशाहीविरोधी आहे. मी ५० वर्षांहून अधिक काळ संसदीय पद्धतीमध्ये काम केलं आहे. पण पीठासीन अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारचं वर्तन अजिबात अपेक्षित नव्हतं’, असं म्हणत शरद पवारांनी टीका केली आहे.

सदस्यांची प्रतिक्रिया साहजिक होती!

दरम्यान, यावेळी राज्यसभेत आक्रमक होण्याची सदस्यांची भूमिका साहजिकच होती, असं म्हणत शरद पवारांनी आंदोलनकर्त्या सदस्यांची पाठराखण केली. ‘काही सदस्य चर्चेविना बिल मंजूर करून घेणं नियमाविरूद्ध असल्याचं उपसभापतींना सांगत होते. पण त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सदस्यांनी अध्यक्षांसमोर धाव घेतली. पण सदस्य सांगत असलेल्या नियमाबद्दल ऐकून घेण्याची अपेक्षा अध्यक्षांकडून होती. पण ते न करता विधेयकावर आवाजी पद्धतीने मतदान घेतलं. त्यामुळे सदस्यांची प्रतिक्रिया साहजिक होती. ज्या सदस्यांनी प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केला, त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. त्याचाच निषेध म्हणून सदस्य काल संध्याकाळपासून आज सकाळपर्यंत आंदोलन करण्यासाठी संसद भवनात शांततेच्या मार्गाने केलं. मला आनंद आहे की आंदोलनकर्त्या सदस्यांनी उपसभापतींनी आणलेला चहा घेतला नाही’, असं ते म्हणाले.


हेही वाचा – दिल्लीत गोंधळ; राज्यसभेतल्या राड्याने व्यथित होऊन उपसभापतीच उपोषणावर!
First Published on: September 22, 2020 12:29 PM
Exit mobile version