अवनीच्या मुद्यावर शिवसेना भाजपला घेरणार

अवनीच्या मुद्यावर शिवसेना भाजपला घेरणार

प्रतिनिधी:- नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याच्या मुद्यावर भाजपला घेरण्याची व्यूहरचना शिवसेनेने रचली आहे. सेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपल्या मंत्र्यांना अवनीचा जाब मागण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय १९ तारखेपासून सुरू होणार्‍या विधिमंडळाच्या अधिवेशनात शिवसेना अवनीच्या मुद्यावर सरकारला घेरण्याची शक्यता आहे.अवनीला ठार मारल्यानंतर सुरू झालेल्या टीकेनंतर राज्यातले भाजप सरकार बॅकफुटवर आले आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याणमंत्री मेनका गांधी यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपदावरून दूर करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असताना आता शिवसेनेनेही हे प्रकरण लावून धरण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेना नेते, युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी नरभक्षक वाघीण अवनीच्या हत्येनंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत जाब विचारला आहे. काल उध्दव ठाकरे यांनी येणार्‍या कॅबिनेटमध्ये अवनीचा जाब विचारण्याच्या सूचना आपल्या मंत्र्यांना दिल्या. सेनेवर टीका करणार्‍या मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती म्हणून मुनगंटीवारांचा परिचय आहे. हाच धागा पकडून शिवसेनेने मुनगंटीवारांना घेरण्याचे निश्चित केल्याचे सांगण्यात आले.

अवनीची हत्या का केली, असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित करत अवनीचा एन्काऊंटर हा फेक असल्याचा आरोप केला आहे. सेनेच्या मुखपत्रातील संपादकीयातून अवनीच्या मृत्यूबद्दल सरकारवर कडक टीका केली. ही टीका राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने केल्याने मुनगंटीवार यांची कोंडी झाली आहे. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवनीच्या कथित हत्येच्या चौकशीचे आदेश दिल्याने मुनगंटीवार अडचणीत आले आहेत. याचवेळी मनेका गांधी यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा राजीनामा घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करून खळ्बळ उडवून दिली आहे. आपल्यावरील टीकेला मुनगंटीवार यांनी उत्तर दिले असून वाघिणीच्या हल्ल्यात मृत झालेल्या लोकांचाही मला विचार करावा लागतो, असा टोला लगावला आहे.

बिर्ला-अंबानींसाठी अवनीचा बळी

नरभक्षक अवनी वाघिणीला ठार मारून बिर्ला आणि अंबानी यांच्या उद्योगांचा मार्ग मोकळा करून दिल्याचा आरोप माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. एखादा वन्य प्राणी वन्य कायद्यानुसार जर हिंसक बनत असेल तर त्याला बेशुद्ध करुन पकडणे, असा नियम आहे. पण अवनी वाघिणीला बेशुद्ध करण्याऐवजी थेट ठार मारण्यात आले . बिर्ला आणि अंबानींच्या उद्योगाला अडसर झालेल्या वाघिणीची हत्या करून वन खात्याने या उद्योगांचा मार्ग मोकळा करून दिला आहे.
– जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

First Published on: November 7, 2018 1:58 AM
Exit mobile version