शिवसेनेचा अयोध्या ‘हुंकार’ संपला

शिवसेनेचा अयोध्या ‘हुंकार’ संपला

मागील दोन दिवसांपासून देशभर बहुचर्चित राहिलेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा अखेर शांततेत पार पडला. रामजन्मभूमीवर रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधून उद्धव ठाकरे दुपारी साडेबारा वाजता मुंबईच्या दिशेने रवाना झाले. तेव्हा त्यांचे मुंबईच्या विमानतळावरही हजारो शिवसैनिकांनी पृष्पवृष्टी करून ढोल-ताशाच्या गजरात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते, परिवहन मंत्री दिवाकर रावते, शिवसेना नेते आदेश बांदेकर, खासदार विनायक राऊत यांच्यासह अन्य नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी सहपरिवार हजारो शिवसैनिकांसोबत अयोध्या दौरा यशस्वी पार पाडला.या दौर्‍याचा जो हेतू होता तो साध्य झाल्याने शिवसेनेने भाजपसमोर राजकीय आव्हान उभे केले आहे.

शिवसेनेच्या या अयोध्या दौर्‍यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसाठी राममंदिर हाच महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. यानिमित्ताने शिवसेनेला मागील ५० वर्षांत जे जमले नाही, ते या दौर्‍यानिमित्ताने शिवसेनेचे राजकीय सीमोल्लंघन करत अयोध्येत पहिला शाखाही उभी केली आहे. सेनेला अयोध्येत अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या या अयोध्यावारीचे वैशिष्ठ्य म्हणजे जी संतांची ताकद आजवर भाजपच्या पाठिशी उभी होती ती आता शिवसेनेकडे झुकल्याचे दिसून आले. शिवसेनेने लक्ष्मण किला येथे आयोजित केलेला संत सन्मान सोहळा आणि आशीर्वादोत्सवाला राम जन्मभूमी न्यासाचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास यांच्यासह सर्वच प्रमुख संत उपस्थित होते. या सोहळ्याचे संपूर्ण व्यासपीठ संतांच्या उपस्थितीने व्यापले होते. अयोध्या वा उत्तर प्रदेशात भाजपच्या एखाद्या धार्मिक कार्यक्रमाला जसा प्रतिसाद मिळतो तसा प्रतिसाद शिवसेनेच्या या सोहळ्याला मिळाला.

शनिवारच्या शक्तीप्रदर्शनानंंतर उद्धव ठाकरे यांनी रविवारी सकाळी ९ वाजता पत्नी रश्मी ठाकरे, चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्यासह रामजन्मभूमीवर जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. तिथेही त्यांचे पुजार्‍यांकडून आदराने स्वागत झाले. त्याठिकाणी उद्धव ठाकरे सुमारे ४० मिनिटे होते. त्यांच्या उपस्थितीत रामलल्लाची पूजा झाली. तेथे एका तंबूत प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि भरत यांची मूर्ती आहे. चहुबाजूला एखाद्या तुरुंगासारखी लोखंडी जाळी आहे. ही सगळी स्थिती पाहून उद्धव यांनी आपल्या भावना पत्रकार परिषदेत बोलून दाखवल्या. शिवसेनेचे मोजके नेते तसेच साधू-महंत अशा केवळ १५ जणांनाच दर्शनासाठी आत सोडण्यात आले होते.

शिवसेनेची अयोध्येत पहिली शाखा

या दौर्‍यामागे राजकीय अजेंडा नसल्याचे सांगतानाच युवासेना प्रमुुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अयोध्या येथे शिवसेनेच्या पहिल्यावहिल्या शाखेचे उद्घाटन करून शिवसेनेने सीमोल्लंघन केले. यावेळी शिवसेनेचे सचिव, खासदार अनिल देसाई, मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना नेते आणि तेथील स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन हिंदुत्वाच्या नवीन पर्वाची सुरुवात करत आहोत, असे सांगत लवकरच अयोध्येत शिवसेना सदस्य नोंदणीची सुरुवात करणार आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच शिवसेना उत्तरप्रदेशातही लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचा संदेश अप्रत्यक्षपणे दिला. शिवसेना वाढवण्यासाठी पक्षाच्या सदस्य नोंदणीवर भर द्यावा लागेल, असे शिवसेना खासदार आणि सचिव अनिल देसाई यांनी यावेळी सांगितले.

उत्तर प्रदेशात महत्त्वाकांक्षा वाढल्या

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर शिवसेनेच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत. या दौर्‍यानंतर शिवसेना आता थेट उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊला धडकण्याची तयारी करणार आहे. याठिकाणी भव्य मेळावा घेण्याचा मनसुबा शिवसेनेना आखला आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेनेच्या नेत्यांचा उत्तर प्रदेशात वारंवार दौरा होणार हे निश्चित !

अयोध्येमध्ये राम मंदिर बांधणे ही आमची प्राथमिकता आहे. त्यासाठी संविधानिक मार्ग शोधला जाईल, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, त्यामुळे यासाठी अध्यादेश काढता येणार नाही.
– अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

उद्धव ठाकरे यांचे अयोध्येला जाणे हे युतीसाठी पोषक आहे, उद्धव ठाकरे अयोध्येला गेले याचा आनंद आहे. मंदिर झाले पाहिजे हे सर्व हिंदू बांधवांना वाटते. प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतल्याने त्यांना प्रभू श्री राम नक्कीच आशिर्वाद देतील.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

First Published on: November 26, 2018 6:02 AM
Exit mobile version