श्रमजीवीच्या युवकांनी खड्ड्यांनी दिली मंत्र्यांची नावे

श्रमजीवीच्या युवकांनी खड्ड्यांनी दिली मंत्र्यांची नावे

प्रातिनिधीक फोटो

भिवंडी-वाडा महामार्गावरील जीवघेण्या खड्डयांविरोधात आज श्रमजीवी संघटनेच्या युवकांनी अनोखे आंदोलन करत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीला दणका दिला. श्रमजीवी संघटनेचे युवक जिल्हाप्रमुख प्रमोद पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात श्रमजीवी युवकांनी वृक्षारोपण करत खड्ड्यांचे मंत्र्यांच्या नावाने नामकरण करत सगळ्यांचे लक्ष वेधले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत मंत्री चंद्रकांत पाटील, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, पालघर जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह सुप्रीम कंपनीचे अधिकारी शेख यांची नावे खड्ड्यांना देऊन एक अनोखे आंदोलन केले. १ ऑगस्ट पर्यंत सर्व खड्डे भरले नाही तर टोलनाका बंद करू, असा इशारा अशोक सापटे आणि प्रमोद पवार यांनी दिला आहे.

भिवंडी ते अंबाडी दरम्यान तब्बल १ हजार ७३३ खड्डे

भिवंडी-वाडा मनोर महामार्ग तब्बल साडेतीनशे कोटी रुपये ठेका असलेला बीओटी मार्ग खड्डेमय झाला आहे. नादुरुस्त रस्त्यामुळे अनेक अपघात घडल्याने ठेकेदार आणि अधिकारी यांच्याबाबत प्रचंड संताप आहे. याबाबत श्रमजीवी संघटनेच्या युवकांनी आवाज उठवला होता. आंदोलनाचा इशारा देऊन खड्डे मोजणीचा कार्यक्रम हाती घेतला होता. श्रमजीवी युवकांनी खड्ड्यांची संख्या मोजत भिवंडी ते अंबाडी १ हजार ७३३ खड्डे शोधले. हा आकडा आणि एक मागणीपत्र सरकारला देऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलेल्या प्रति खड्डा एक हजार रुपये याप्रमाणे १७ लाख ३३ हजार रुपये बक्षिसाची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच यावेळी खड्डेमय रस्ता बनविणारे अधिकारी आणि ठेकेदार यांना आदर्श खड्डेमय ठेकेदार अधिकारी पुरस्कार देण्यात आला.

हेही वाचा – अंबरनाथ स्मार्ट सिटीच्या अध्यक्षपदी विशाल ठोंबरे

१ ऑगस्टपर्यंत सर्व खड्डे कोल्ड मिक्सने भरा

श्रमजीवीने आंदोलनाचा इशारा देताच सुप्रिम कंपनीने खड्डे भरण्याचे काम सुरु करून थातूर मातूर दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. पण संघटनेच्या तरुणांनी तोही प्रयत्न हाणून पाडत त्याचाही पंचनामा केला. आज या खड्ड्यांमध्ये रोपं लावत अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. १ ऑगस्ट पर्यंत सर्व खड्डे कोल्ड मिक्स द्वारे भरण्यात यावेत, अन्यथा टोल बंद करणार असा इशारा यावेळी देण्यात आला. सर्व मागण्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता सी एच पाटील, कनिष्ठ अभियंता पातकर यांनी लेखी आश्वासन दिले. लवकरच या पूर्ण रस्त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अपूर्ण कामाचा अहवाल सार्वजनिक करण्याबत लेखी घेतले.

First Published on: July 19, 2019 6:27 PM
Exit mobile version