…तर त्यांनी राजकीय पक्षात येऊन राजकारण करावं; सुषमा अंधारेंचा महापालिकेला टोला

…तर त्यांनी राजकीय पक्षात येऊन राजकारण करावं; सुषमा अंधारेंचा महापालिकेला टोला

अंधेरी पोटनिवडणूक सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. याच निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके या त्यांच्या राजीनाम्यावरून अडचणीत आल्या होत्या पण आता मुंबई हाय कोर्टाने त्यांना दिलासा दिलेला आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारल्याचे पत्र द्या, असे आदेश कोर्टाने मुंबई महानगर पालिकेला दिलेले आहेत.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यात येत आहे. परंतु त्यांच्या राजीनाम्यावरुन तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेत लिपिक पदावर कार्यरत होत्या. मुंबई महापालिकेने त्यांच्या राजीनामा मंजुरीबाबत नकारात्मकता दाखविल्यानंतर ऋतुजा लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान गुरुवारी ३ वाजण्याच्या सुमारास न्यायालयाने ऋतुजा लटके यांना दिलासा दिला. मुंबई महानगर पालिकेला उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत राजीनामा स्वीकारल्याचे पत्र द्या असे आदेश कायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्या ३ वाजेपर्यंत ऋतुजा लटके यांना अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदावारी अर्ज दाखल करता येणार आहे.

दरम्यान, ऋतुजा लटके यांना न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, ”भारतीय संविधानाची एक चौकट आहे, एका विभागाने दुसऱ्या विभागात हस्तक्षेप करायचा नसतो. पण मागील काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिका आपले हसं करुन घेत आहे. या आधीही दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरेंना मैदान मिळू नये, यासाठी मुंबई महानगर पालिकांच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले होते. त्यांना एवढी राजकारणाची आवड असेल तर त्यांनी राजकीय पक्षात येऊन राजकारण करावं, असा खोचक टोला सुद्धा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला. तसेच ”शिवसेनेचा प्लॅन बी नसतो. आम्ही थेट भिडणारे लोक आहोत. त्यामुळे उद्या ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज आम्ही धुमधडाक्यात भरु” असंही शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या.


हे ही वाचा – भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते आधीच मुख्यमंत्री झाले असते, उद्धव ठाकरेंची कोपरखळी

First Published on: October 13, 2022 5:16 PM
Exit mobile version