उत्पन्न बुडवणाऱ्या जिमखान्यांवर कारवाई करा; राज्यमंत्रीअब्दुल सत्तारांचे निर्देश

उत्पन्न बुडवणाऱ्या जिमखान्यांवर कारवाई करा; राज्यमंत्रीअब्दुल सत्तारांचे निर्देश

मंत्री अब्दुल सत्तार

मुंबई शहर आणि उपनगरातील शासकीय जमिनीवर अनेक जिमखाने भाडेतत्त्वावर दिलेले आहेत. शासनाच्या मालमत्तेवर लाखो रुपये कमवून शासनाचा वाटा देत नसलेल्या जिमखान्यांवर कारवाई करून दंड वसूल करण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी दिले. मुंबईतील जिमखान्याबाबत सत्तार यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी जिमखान्यांसाठी दक्षता पथक नेमण्याची सूचना महसूल विभागाला केली.

मुंबई आणि उपनगरात अनेक जिमखाने आहेत. ते शासकीय जमिनीवर नाममात्र भाडे तत्वावर दिले आहेत. मात्र अनेक जिमखान्यांमध्ये क्रीडेतर कामांना जागा भाड्याने दिल्या जातात. त्यातून लाखो रुपयांची कमाई केली जाते. मात्र शासनाला त्याचा योग्य वाटा मिळत नाही. त्यामुळे याप्रकरणी दक्षता पथक नेमून जागेवर जाऊन कारवाई करण्याचे निर्देश अब्दुल सत्तार यांनी बैठकीत दिले. तसेच पूर्वपरवानगी न घेता कार्यक्रम करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचेही निर्देशही त्यांनी दिले.

क्षेत्रफळानुसार दर आकारणी करा

क्रीडेतर कार्यक्रमासाठी जिमखान्यांची जागा भाड्याने देताना क्षेत्रफळानुसार दराची आकारणी करावी.तसेच पूर्वपरवानगी न घेता कार्यक्रम करणाऱ्यांवर पाचपट दंड आकारावा आणि कराराचे नूतनीकरण न करणाऱ्यांना तात्काळ नोटीस बजावा. तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी महिन्यातून एकदा जिमखान्याला भेट देऊन तपासणी करावी, अशा सूचना अब्दुल सत्तार यांनी दिल्या. स्वतःची जागा असताना अनेक वेळा सरकारला कार्यक्रमांसाठी जागा भाड्याने घ्याव्या लागतात. त्यामुळे प्रत्येक जिमखान्याने शासकीय कार्यक्रमांसाठी वर्षातून काही दिवस जागा राखीव ठेवाव्यात, असे निर्देशही सत्तार यांनी दिले.


First Published on: June 17, 2021 10:57 PM
Exit mobile version