मुंबईच्या तिरा कामतसाठी औषध आयातीवरील कर केंद्राकडून माफ

मुंबईच्या तिरा कामतसाठी औषध आयातीवरील कर केंद्राकडून माफ

अखेर 'तीरा'ला झुंज देण्यात मिळाली इंजेक्शनची मदत

अखेर अथक प्रयत्नानंतर तिराच्या आई-वडिलांना दिलासा मिळाला आहे. मुंबईतील पाच महिन्यांच्या तिरा या बालिकेच्या उपचारासाठी आवश्यक असणारी औषध अमेरिकेतून येणार होती. मात्र, या औषधांवर कोट्यवधीचा कर लागणार होता. परंतु, अथक प्रयत्नानंतर आता आयात करण्यासाठी लागणारे सर्व कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानले आहेत.

आणि अखेर कर माफ केला

तिरा कामत ही मुंबईतील पाच महिन्यांची बालिका असून, तिला जीन रिप्लेसमेंट उपचारांची नितांत गरज आहे. तिच्या या उपचारांसाठी लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात योगदान दिले आणि यासाठी सुमारे १६ कोटी रूपये गोळा करण्यात आले. पुढील उपचारासाठी ‘झोलजेन्स्मा’ हे औषध अमेरिकेतून आयात करावे लागणार होते. मात्र, हे औषध भारतात आणण्यासाठी जीएसटी, कस्टम करांसह सुमारे ६.५ कोटी रूपये आणखी खर्च येणार होता. त्यामुळे पालकांनी त्यातून सूट मागण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे या औषधावरील या सर्व करांतून सूट मागण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी १ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून त्यासंबंधीची विनंती केली. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी निर्देश देताच, तातडीने त्यावर कार्यवाही झाली आणि त्यानुसार, ९ फेब्रुवारीला या औषधीपुरता सर्व कर माफ करणारा आदेश वित्त विभागाने जारी केला.

काय म्हणाले पंतप्रधान?

‘पंतप्रधानांनी अतिशय संवदेनशीलतेने पुढाकार घेत तात्काळ दखल घेतली. यामुळे तिरा कामत हिचे प्राण वाचतील’, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच या त्वरित कारवाईबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार सुद्धा मानले आहेत. तिरा कामत हिला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा सुद्धा त्यांनी दिल्या आहेत.


हेही वाचा – मुंबई-वर्सोवात सिलेंडरच्या गोदामाला आग; ४ जण जखमी


 

First Published on: February 10, 2021 11:57 AM
Exit mobile version