यशाच्या पायर्‍या चढण्याची रुणालीची जिद्द कायम

यशाच्या पायर्‍या चढण्याची रुणालीची जिद्द कायम

रूणाली मोरे

रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावणार्‍या ठाण्यातील रूणाली मोरेचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेना मदत करणार आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुणालीची हॉस्पीटलमध्ये जाऊन विचारपूस केली. तसेच तिच्या उपचाराचा व शिक्षणाचा खर्च उचलण्याचं आश्वासन तिच्या कुटूंबियांना दिलं. यावेळी रुणालीने तिला शिकून डॉक्टर व्हायचं असल्याची जिद्दअजूनही कायम असल्याचे आपल्या डोळ्यातून इशारे करून सांगितले.

ठाण्यात रेल्वे स्थानकावरील पाच नंबर फलाटावरून सीएसटीकडे जाण्यासाठी निघाली असतानाच रुणालीला चुकून धक्का लागल्याने ती रेल्वे रूळावर पडली होती. यावेळी समोरून येणार्‍या लोकलच्या अपघातात तिला दोन्ही पाय गमवावे लागले. हा प्रकार १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला घडला होता. रूणालीवर सावरकर नगरातील स्पर्श हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. घरची परिस्थिती हालाखीची त्यात शिक्षण घेऊन डॉक्टर बनण्याचे रूणालीचे स्वप्न आहे. रूणालीची आई घरकाम करते तर वडील हेमंत मोरे हे रोजंदारीवर काम करीत आहेत. त्यामुळे रुणालीचा खासगी रूग्णालयाचा खर्च कुटूंबियांना पेलवणारा नाही. त्यामुळे त्यांनी मदतीची विनंती केली होती. अखेर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रूणालीची रूग्णालयात जाऊन भेट घेतली आणि तिच्या उपचाराचा तसेच शिक्षणाचा खर्च शिवसेना उचलणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळ मोरे कुटूंबियांना दिलासा मिळाला आहे.

काय घडले त्या दिवशी?

ठाण्याच्या मानपाडा येथील कारबन हायस्कूलमध्ये नववीत शिकणारी रुणाली हेमंत मोरे ही विद्यार्थीनी दहावीच्या पुढील वर्षासाठी क्लासची माहिती घेण्यासाठी ठाण्यात गेली होती. घरातून बाहेर पडल्यावर तिला रेल्वेचा असा एकट्याने केलेल्या प्रवासाचा अनुभव नव्हता. घर आणि शाळा इतकेच तिचं जग होतं. त्या दिवशी पहिल्यांदाच घर आणि शाळेच्या परिसराबाहेर रुणाली पडली. ठाणे स्टेशन परिसरातील प्रचंड गर्दीने ती गांगरून गेली आणि कुठे जायचे नेमके कळेनासे झाले. त्यातच ती सॅटीसच्या ब्रीजवर काही वेळ बसून राहिली आणि रोजच्या गर्दीसोबतच स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उतरली. ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर कल्याणच्या दिशेला निघालेल्या प्रवाशांच्या मागे ती वाट काढत निघाली होती. त्याच वेळी कल्याणकडे जाणार्‍या रेल्वेरूळाजवळ तिला कुणाचातरी धक्का लागला आणि ती रेल्वे रुळावर कोसळली आणि काही क्षणातच समोरून येणार्‍या लोकलखाली तिचे दोन्ही पाय कापले गेले. त्यानंतर पोलिसांनी आणि काही प्रवाशांनी तिला ठाण्याच्या सावरकरनगर येथील स्पर्श रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुणालीची उपचारानंतर आता प्रकृती स्थिरावली आहे. मात्र अजून 20 दिवस रुग्णालयात तिला थांबावे लागणार आहे. हे सर्व उपचार खाजगी रुग्णालयात होत असून त्याचा खर्च सुमारे 5 लाखापर्यंत असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले आहे. रुणालीच्या शाळेने मदतीचा हात देत 25 हजार रुपयांचा चेक रुणालीच्या उपचाराकरता कुटुंबाकडे सुपूर्द केला आहे.

भाड्याच्या खोलीत राहणार्‍या रुणालीच्या कुटुंबाची घरची परिस्थिती अतिशय बेताची आहे. मुलांचे शिक्षण कुटुंबाचा उदरनिर्वाह यासाठी आई घरकाम करते तर वडील मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र मागील वर्षभरापासून त्यांना काम जमत नसल्याने ते घरीच आहेत. त्यांना एका डोळ्याने दिसत नाही तर दुसर्‍या डोळ्याचीही स्थिती नाजूक आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब आईच्या घरकामावर अवलंबून असल्याचे सांगितले. तर रुणालीचा भाऊ रुषभ यावर्षी ठाकूर महाविद्यालयातून 12 पास झाला आहे.

या लोखंडी पायर्‍या माझी मुलगी कशी चढेल…?आमचं स्वतःच घर नाही. मानपाडा परिसरात भाड्याने राहात आहोत. तेही चाळीतील वरच्या मजल्यावर. या मजल्यावर जाण्यासाठी लोखंडी शिड्या आहेत. आता या शिड्यांवरून रुणाली घरामध्ये कशी येईल. केवळ औषधोपचारच नाही तर आता घरही बदलावे लागेल. ही चिंता आता मला सतावत आहे. यासाठी मित्र परिवार आणि नातेवाईकांकडे मदत मागितली आहे. शिक्षण घेऊन डॉक्टर बनण्याचे ती नेहमी म्हणत असते. पण आता तिच्या या अवस्थेने मनात भीती निर्माण झाली आहे.
– आशा मोरे , रुणालीची आई

जखमी अवस्थेत रुणालीला ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, सिव्हिल रुग्णालयात रुणालीवर उपचारासाठी यंत्रणा नसल्याने त्यांनी केईएम रुग्णालयात हलवण्यास सांगितले. परंतु अशा अवस्थेत आम्हाला ते योग्य वाटले नाही. म्हणून आम्ही आमच्या जबाबदारीवर या रुग्णालयात दाखल केले. आम्ही सर्व नातेवाईक जवळच रहात असल्याने आम्ही हे पाऊल उचलले.
– नैनेश भालेराव (काका)

उपचारानंतर आता रुणालीची प्रकृती स्थिरावली असून प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र अजून काही छोट्या शस्त्रक्रिया कराव्या लागणार असल्याने तिला पुढील 20 दिवस तरी रुग्णालयातच रहावे लागेल.
– डॉ. प्रवीण भणगे, स्पर्श रुग्णालय सावरकरनगर

First Published on: August 21, 2018 5:00 AM
Exit mobile version