अवैध रेती उपसा विरोधात कारवाई, ६ कोटी ४८ लाखाचा मुद्देमाल नष्ट  

अवैध रेती उपसा विरोधात कारवाई, ६ कोटी ४८ लाखाचा मुद्देमाल नष्ट  

अवैध रेती उपसा विरोधात कारवाई

ठाणे जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात महसूल विभागाने हाती घेतलेल्या धडक कारवाईमध्ये सुमारे ६ कोटी ४८ लाखाचे साहित्य आणि रेतीसाठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पारसिक कळवा रेती बंदर, काल्हेर रेती बंदर, वडूनवघर, खारबाव, वेहळे, उल्हास नदी खाडी पात्र, टेंभा, तानसा या परिसरातील खाडी किनारी सक्शन पंपांच्या साहाय्याने अवैध रेती उपसा मोठ्या प्रमाणावर होतो, अशा तक्रारी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्या नेतृत्वाखाली आज ठाणे, कल्याण,भिवंडी आणि शहापूर या ठिकाणी तहसिलदार यांनी धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

३३० ब्रास रेती साठा जप्त

या कारवाईमध्ये ३२ सक्शनपंप आणि २५  बार्ज गॅस कटरच्या सहाय्याने नष्ट करण्यात आले.  तर ३३० ब्रास रेती साठा  तसेच ५० ठिकाणी रेती उपसासाठी उभारण्यात आलेले हौद उध्दवस्त  करण्यात आले आहेत. ठाणे तहसीलदार अधिक पाटील आणि त्यांच्या टीमने मुंब्रा पारसिक कळवा  रेतीबंदर आणि गणेश घाट परिसरात कारवाई करीत ८ सक्शन पंप आणि ८ बार्ज जप्त करून नष्ट केले. तर भिवंडी तहसिलदार शशिकांत गायकवाड आणि त्यांच्या कारवाईला सुरुवात केली असून ९ सक्शन पंप आणि ६ बार्ज जप्त करून नष्ट केले आहेत. तसेच ६ अधिकाऱ्यांसह  महसूल विभागातील कर्मचारी, पोलीस असे १५० जणांचे पथक या कारवाईत सहभागी झाले होते.

कल्याण तहसिलदार दिपक आकडे आणि त्यांच्या टीमने देखील उल्हास नदी खाडी पात्रात प्रत्यक्ष उतरून अवैध रेती उपसा विरोधात कारवाई केली आहे. यावेळी कल्याण तालुका हद्दीतील खाडी पात्रातील ११ सक्शनपंप नष्ट करण्यात आले. तर, ९ बार्ज जप्त करण्यात आले.  तसेच २१ ठिकाणी रेती उपसासाठी उभारण्यात आलेले हौद उध्दवस्त करण्यात आले.  शहापूर तहसिलदार नीलिमा सूर्यवंशी आणि त्यांच्या टीमने टेंभा आणि तानसा या दोन ठिकाणी नदी पात्रात कारवाई करून ४  सक्शनपंप नष्ट केले आहेत. तर अंबरनाथ तहसिलदार येथे कारवाई करत २ सक्शनपंप नष्ट केले आहे. या संपूर्ण कारवाई साठी २ बोटी, २ हायड्रा, २ पोक्लेन, ३ गॅस कटर मशिन्स, ४ जेसीबी आणि १ बाज  या साहित्याचा वापर करण्यात आला. अवैध रेती उत्खनाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पाऊले उचलली असून सातत्याने अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.


हेही वाचा – वाडिया रुग्णालयाचे भवितव्य ठरणार; मुख्यमंत्री घेणार महत्त्वपूर्ण बैठक


 

First Published on: January 14, 2020 1:07 PM
Exit mobile version