बेस्टचे बोगस पास बनविणार्‍या टोळीचा पर्दाफाश

बेस्टचे बोगस पास बनविणार्‍या टोळीचा पर्दाफाश

पतीसह प्रेयसीला अटक

बेस्टचे बोगस पास बनविणार्‍या एका टोळीचा चेंबूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पाच आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून बोगस पासेसचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. अनिकेत शरद जाधव, पाशा शहाबुद्दीन शेख, अर्जुन रामाश्रयदास पटेल, अनुराग विद्याशंकर तिवारी आणि कुशाल कैलास पाटील अशी या पाचजणांची नावे आहेत. ते सर्वजण वडाळा आणि चेंबूर, वाशीनाका परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. 29 ऑक्टोबरला सकाळी सव्वाआठ वाजता बेस्ट निरीक्षक राम शिंदे यांनी म्हाडा कॉलनी-कुर्ला रेल्वे स्थानक दरम्यान धावणारी बस क्रमांक 369 मध्ये एका प्रवाशाचे पास तपासला असता बोगस असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पाशा शेख या प्रवाशाला त्यांनी कुर्ला बस डेपो येथे आणले.

तिथे पासची संगणकाद्वारे तपासणी केल्यानंतर ते पास बोगस असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी चेंबूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. याप्रकरणी फसवणुकीसह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच पाशा शेख याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीत त्याच्या इतर चार साथीदाराचे नाव समोर आले होते. त्यानंतर चेंबूर पोलिसांच्या एका विशेष पथकाने वेगवेगळ्या परिसरातून अनिकेत जाधव, अर्जुन पटेल, अनुराग तिवारी आणि कुशाल पाटील या चौघांना अटक केली.

पोलीस तपासात अनिकेत हा वडाळा बस डेपोमध्ये ट्रायमॅक्स कंपनीद्वारे बेस्ट बस पास बनविल्या जाणार्‍या कंपनीचा कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याने आतापर्यंत 300 ते 400 लोकांना बेस्टचे बोगस पास कमी पैशांमध्ये बनवून दिले होते. त्यामुळे बेस्टचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ही टोळी सक्रिय होती. मुंबई शहरात बेस्टने प्रवास करायचा असल्यास तीन महिन्यांच्या पासची किंमत सुमारे सहा हजार रुपये आहे. मात्र ही टोळी अवघ्या दोन ते तीन हजार रुपयांमध्ये ते पास बनवून देत होते. जुने पासधारक असलेल्या व्यक्तीच्या पासमधील सात अंकी क्रमांक कॉपी करायचा, त्यानंतर नवीन पासमध्ये तो क्रमांक टाकत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सध्या पाचही आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

First Published on: November 5, 2018 1:46 AM
Exit mobile version