वरळीत झाडांची निर्घृण कत्तल, वृक्षतोडीवरून रंगले राजकारण

वरळीत झाडांची निर्घृण कत्तल, वृक्षतोडीवरून रंगले राजकारण

झाडांची कत्तल

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात झालेल्या वृक्षतोडीवरून आता राजकारण रंगताना दिसत आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वरळीत झालेल्या या वृक्षतोडीची पाहणी केली. होर्डिंगसाठी झाडं कापली गेली असा आरोप यावेळी दरेकरांनी केला आहे. तर शिवसेना मात्र झाल्याप्रकाराबाबत गप्प आहे. वास्तविक ही झाडे तोडल्याचे बुधवारी पहाटे कळून आले. त्यानंतर त्याच दिवशी मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्याची रितसर तक्रारही केली. पण अद्याप त्याबाबत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

मागील बुधवारी पहाटे लोअर परळ, सेनापती बापट मार्गावर रघुवंशी मिलच्या चार ते पाच झाडांची कत्तल करण्यात आल्याचे उघडकीस आले. सकाळी मार्निंग वॉकसाठी गेलेल्या काहीजणांना ती झाडे कुर्‍हाडीचे घाव घालून तोडल्याचे दिसून आले. त्यापैकी काहीजणांनी त्याच झाडांचे फोटो काढले आणि विविध व्हॉटस्अ‍ॅपवर पाठवून दिले. झाडे कापल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली. स्थानिक मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याची रितसर तक्रार पोलीस आणि महापालिकेकडे केली. त्यानंतर मात्र, मुंबईत या घटनेची मोठी बातमी झाली. ज्या विभागात झाडे कापण्यात आली होती तो विभाग हा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात येतो. आरे कॉलनीतील झाडांच्या संरक्षणासाठी मेट्रोचा बळी देणार्‍या सरकारमधील पर्यावरण मंत्र्यांच्याच मतदार संघात झाडे कापणे हा निश्चितच राजकारणाच्यादृष्टीने मोठा मुद्दा ठरतो. मागील काही दिवसांपासून त्या झाडांना राज्य पातळीवर प्रसिद्धी मिळणे काही नवल नाही. रघवंशी मिलच्या समोरच्या परिसरात फूटपाथ लगत पूर्वी मोठी झाडे होती. पण रघुवंशी मिल, फिनिक्स मिलचा कायापालट झाला.

तेथे मॉल, हॉटेल्स उभी राहिली आणि ती मोठी झाडे कधी कापली गेली हे कोणालाही कळले नाही. त्यावेळी पर्यावरणचे स्तोम इतके नसल्यामुळे त्या कापल्या गेलेल्या मोठ्या वृक्षांबद्दल कोणी गळेही काढले नाहीत. पंचताराकित हॉटेल, मॉल उभे राहिले असताना त्याच्या समोरचा परिसर रेल्वे सुरक्षा बलाच्या सैनिकांच्या घराजवळचा परिसर बोडका असावा हे काही योग्य नव्हते. त्यामुळे अखेर रेल्वे सुरक्षा बलाच्या सैनिकांच्या घरानजीकची भिंत विविध चित्रांनी सजवण्यात आली. त्याचबरोबर फूटपाथवर झाडेही लावण्यात आली.

मागील काही वर्षांत झाडांनी चांगले बाळसे धरले. ही झाडे चांगली दहा-बारा फुटापर्यंत वाढली. त्याचच खरी गोम होती. कारण झाडे वाढली तरी रेल्वे कॉलनीला लावण्यात आलेले मोठाले जाहिरात बॅनर झाकले जाणार हे उघड होते. त्यातूनच या झाडांचा बळी घेतला गेला असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे त्या ठिकाणी रात्री रोज नाकाबंदी असते. तरीही चोरट्यांनी हे धाडस केले हे विशेष. रविवारी भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर त्याठिकाणी आले. त्यांनी झाडांची पाहणी केली. पण अद्यापही ती झाडे कोणी तोडली याचा पत्ता लागलेला नाही.

पर्यावरणमंत्र्यांच्या मतदारसंघातच झाडांची कत्तल झाली. हा कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार असून याबाबत कडक कारवाई झाली पाहिजे. मुंबई मनपा व पर्यावरण विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच झाडांची अमानुष कत्तल करण्याची हिंमत वृक्षशत्रू दाखवू शकले. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे.
-प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद.

First Published on: June 6, 2021 11:57 PM
Exit mobile version