राजधानीचे अंतिम वेळापत्रक

राजधानीचे अंतिम वेळापत्रक

राजधानी एक्स्प्रेस

मध्य रेल्वेने राजधानी एक्स्प्रेसचा प्रवासाच्या कालावधी कमी करण्यासाठी वारंवार वेळापत्रकात बदल करण्याचा प्रयोग सुरू केला होता. त्यामुळे प्रवाशांची बरीच गैरसोय झाली. या प्रकरणी दैनिक ‘आपलं महानगर’ने यासंबंधी वृत्त दिल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने आता राजधानीचे अंतिम वेळापत्रक तयार केले आहे.

मध्य रेल्वे मार्गावरून सीएसएमटी ते हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस सीएसएमटीहून दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांनी सुटणार आहे. हे नवीन वेळापत्रक बुधवारपासून म्हणजे १७ एप्रिलपासून लागू होणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरून सुरू करण्यात आलेल्या राजधानी एक्स्प्रेसच्या वेळेत सतत बदल होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. इतकेच नव्हे तर प्रवाशांनी सुद्धा या संबंधित तक्रार मध्य रेल्वे प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर दैनिक आपलं महानगर या संबंधित वृत्त दिलेे. या वृतानंतर मध्य रेल्वेने राजधानी एक्स्प्रेची कायमची वेळ ठरवली. या नवीन वेळापत्रकामुळे राजधानी एक्स्प्रेसचा वेग वाढवला जाणार असून प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.

सीएसएमटी मुंबई ते हजरत निजामुद्दीन दिल्ली राजधानी एक्स्प्रेस सुरुवातीला दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी सुटत होती. मात्र आता नवीन वेळापत्रकानुसार दर बुधवार आणि शनिवारी सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांनी सुटेल. हजरत निजामुद्दीन येथून सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी राजधानी मुंबईसाठी रवाना होईल. तर सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी सीएसएमटीला पोहोचेल. १ जूनपासून राजधानी एक्स्प्रेसला एक प्रथम श्रेणी वातानुकूलित डबा, ५ द्वितीय श्रेणी वातानुकूलित डबा, ११ तृतीय श्रेणी वातानुकूलित डबा आणि एक पॅन्ट्री डबा अशी संरचना करण्यात येणार आहे. राजधानीला प्रवाशांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर मिळत असल्याने ऑगस्ट महिन्यांपासून राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातील पाच दिवस चालविण्यात येणार असल्याची शक्यता आहे. मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसचा वेग वाढवण्यासाठी पूश-पूल पद्धतीचा वापर केला जात आहे. या बदलामुळे प्रवाशांना वेगात दिल्लीला जाणे सोपे होणार आहे.

First Published on: April 17, 2019 3:53 PM
Exit mobile version