Instagram वरून लागला अपहरण झालेल्या मुलीचा शोध!

Instagram वरून लागला अपहरण झालेल्या मुलीचा शोध!

फेब्रुवारी महिन्यात अपहरण झालेल्या १७ वर्षाच्या मुलीचा ‘इंस्टाग्राम’ वरून शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी मुलीचे अपहरण करणाऱ्या ४ जणांच्या मुसक्या आवळल्या असून ३ जण अद्यापही फरार असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.

आबिद माजिद शेख (२१) ,जावेद शेख (२३) ,तन्वीर अहमद अजीजुद्दिन शेख (२१) आणि इस्तियाक अली लियाकत अली (३४) असे अटक कऱण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. अटक केलेले आरोपी आणि फरार असलेले आरोपी हे सर्व जळगाव जिल्हयात राहणारे असून एकमेकांचे नातेवाईक आहेत. काही वर्षांपूर्वी आबिद शेख आणि त्याचे कुटुंब मुंब्रा येथे राहण्यासाठी आले होते. मुंब्रा कौसा येथे राहणारी १७ वर्षाची मुलगी ४ फेब्रुवारी रोजी मुंब्र्यातील एका शाळेजवळून बेपत्ता झाली होती. त्याच दरम्यान आबिद शेख हा देखील बेपत्ता असल्यामुळे त्यानेच मुलीचे अपहरण केले असल्याच्या संशयावरून मुलीच्या आईवडिलांनी मुंब्रा पोलिस ठाण्यात मुलीचे अपहरण झाले असल्याची तक्रार दाखल केली होती. मुंब्रा पोलिसांनी आबिद शेख याच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेत असताना आबीद याचे कुटुंब देखील मुंब्र्यातून गायब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. शहाजी शेळके आणि पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरु केला असता अपहरण करण्यात आलेल्या मुलीचा तसेच अपहरणकर्त्याचा मोबाईल फोन बंद असल्यामुळे पोलिसांना अपहरणकर्त्याची माहिती मिळू शकत नव्हती. चार महिने उलटून देखील मुलीचा थांगपत्ता लागत नव्हता, एकेदिवशी अचानक अपहरण झालेल्या मुलीच्या बहिणीच्या इन्स्टाग्राम पोस्टवर अपहरण झालेल्या मुलीची प्रतिक्रिया आली, यावरून अपहरण कऱण्यात आलेली मुलगी मोबाईल मध्ये इन्स्टाग्राम वापरत असल्याची माहिती सपोनि शेळके यांना मिळाली. शेळके यांनी ठाणे सायबर सेल विभागाची मदत घेऊन इन्स्टाग्रामवरून मुलीचा थांगपत्ता मिळवला असता मुलगी यवतमाळ या ठिकाणी असल्याची माहिती पोलिसाना मिळाली. मुंब्रा पोलीस ठाण्याचे वपोनि मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.शहाजी शेळके आणि पथकाने यवतमाळ जिल्ह्यातील फुलसंवगी गाव येथून अपहरणकर्त्याच्या तावडीतून मुलीची सुटका करून ४ जणांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यात एकूण सात आरोपी असून तिघे जण फरार असल्याची माहिती शेळके यांनी दिली असून अटक आणि फरार आरोपी हे एकमेकांचे नातलग असल्याचे पोलिसांनी सांगितले.


हे ही वाचा – Sushant Suicide Case: सुशांतच्या बँक खात्यांची ‘ईडी’ करणार चौकशी!


First Published on: July 30, 2020 7:38 PM
Exit mobile version