थिएटर आर्टच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

थिएटर आर्टच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव, विभाग प्रमुखच अभ्यासक्रमापासून अनभिज्ञ, नाट्यगृहातील गैरसोईमुळे सराव करण्यात येणार्‍या अडचणी, ग्रथपाल नाही, मुलींना राहण्यासाठी हॉस्टेल नाही असे विविध प्रश्न उपस्थित करत मुंबई विद्यापीठाच्या अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी जोरदार आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणारे विभागाचे संचालक योगेश सोमण यांची हकालपट्टी करण्याची मागणीही यावेळी विद्यार्थ्यांनी केली.

कलाकार घडवण्याची जबाबदारी असलेल्या अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स विभागाच्या संचालकपदी असलेल्या योगेश सोमण यांच्याकडेच गुणवत्तापूर्ण ज्ञान नसून विद्यार्थ्यांना शिकवण्याकडे त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात येते. विभागाचे संचालक असूनही त्यांना अभ्यासक्रमाबाबत कोणतीच माहिती नाही. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणसाठी आवश्यक सोईसुविधा पुरवण्याकडे सोमण यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. विद्यापीठातील नाट्यगृहात इको आवाज येत असल्याने त्यांना सराव करताना अडचणी येतात. विद्यार्थ्यांना कला क्षेत्रासंदर्भातील माहिती मिळावी यासाठी असलेल्या ग्रंथालयात बरेच पुस्तके आहेत. परंतु ग्रंथालयात ग्रंथपाल नसल्याने विद्यार्थ्यांना अचूक माहिती देणारी पुस्तकेच मिळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात अडचणी येतात. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर जे अभ्यासक्रम होणे अपेक्षित होते त्याचे कोणतेही अध्ययन झाले नाही. कोणताही विषय शिकवत असताना त्याचे प्रात्यक्षिक योग्य प्रकारे शिकविले जात नाही.

प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना दिलेल्या माहितीपुस्तकेमध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांचे अध्ययन वर्ग ठेवले आहेत. मात्र त्यातील एकही कलाकार सहा महिन्यात शिकवण्यास आला नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
विभागामध्ये फक्त 40 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असताना सोमण यांनी तब्बल 100 विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण मिळत नाही. प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये दोन अनिवासी भारतीय विद्यार्थी असून, त्यांनी सहा महिन्यांमध्ये आम्ही काहीच शिकलो नसल्याचे सांगितले.

सोमण यांचे विभागाकडे नसलेले लक्ष आणि सोईसुविधांचा अभाव याबाबत विद्यार्थ्यांनी नोव्हेंबरमध्ये विद्यापीठ प्रशासनाला पत्र दिले होते. परंतु त्याकडे विद्यापीठाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर आम्ही आंदोलन केल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. योगेश सोमण हे सक्षम संचालक नसल्याने त्यांची हकालपट्टी करून योग्य संचालकांची नियुक्ती करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यापीठाचे कुलसचिव अजय देशमुख यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे जाणून घेतले. तसेच लवकरच यावर उत्तरे दिली जातील असे आश्वासन दिले.

अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स हा मुंबई विद्यापीठातील महत्त्वाचा विभाग आहे. नाट्य, संगीत, गायन क्षेत्रातील कलाकार घडवण्याचे काम या विभागातर्फे करण्यात येते. असे असतानाही येथील शिक्षणाबाबत विद्यार्थी नाखूश आहेत. हे फारच खेदजनक आहे. त्यामुळे या विभागाला परफॉर्मन्स आर्ट्ऐजव नॉन परफॉर्मन्स आर्ट् का म्हणून नये.
– डॉ. सुप्रिया करंडे, सिनेट सदस्य, युवासेना

First Published on: January 14, 2020 2:19 AM
Exit mobile version