ओला आणि सुका कचऱ्यासोबतच आता घातक कचऱ्यासाठी पेटी

ओला आणि सुका कचऱ्यासोबतच आता घातक कचऱ्यासाठी पेटी

ओला आणि सुका कचऱ्यासोबतच आता घातक कचऱ्यासाठी पेटी

मुंबईमध्ये सध्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक सोसायट्यांमध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा करून त्याची स्वतंत्र विल्हेवाट लावण्यास प्रवृत्त केले जात आहे. परंतु आतापर्यंत मुंबईकरांना ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून दोन्ही कचरा स्वतंत्र पेटींमध्ये ठेवावा लागत असला तरी यापुढे आणखी एका कचरा पेटीची भर पडणार आहे. ओला आणि सुका कचऱ्यासोबत मुंबईकरांना आता घरातील घातक कचरा तिसऱ्या कचऱ्या पेटीत ठेवावा लागणार आहे. त्यामुळे यापुढे मुंबईकरांना प्रत्येक सोसायटीमध्ये ओला आणि सुका कचऱ्यासोबत घातक कचरा वेगळा ठेवावा लागणार आहे.

आता दोन कचऱ्याच्या पेट्या देण्याऐवजी तीन देणार

मुंबईत निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण ९ हजार ५०० मॅट्रिक टनावरून आता ७ हजार २०० मॅट्रिक टनावर आला आहे. मुंबई महापालिकेने ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करणे बंधनकारक करतानाच त्याची विल्हेवाट जागच्या जागी लावण्यासाठी करण्याकरता खत निर्मिती प्रकल्प अथवा कचऱ्यापासून सौर ऊर्जा प्रकल्प आदी राबवणे बंधनकारक केले आहे. त्यामुळेच महापालिकेने कचरा वर्गीकरणाबाबत तसेच विल्हेवाट संदर्भात मुंबई स्वच्छ सर्वेक्षणा अंतर्गत अभ्यास करण्यासाठी लोकल सेल्फ गर्व्हमेंट या संस्थेची सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. या संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करण्याची शिफारस केली आहे. तसेच नगरसेवक निधीतून देण्यात येणाऱ्या कचरा पेट्या देताना, त्या आता दोन ऐवजी तीन देण्याचीही शिफारस केली आहे. मुंबईतील प्रत्येक घरात निर्माण होणारा ओला आणि सुका हा वेगळा ठेवला जात असला तरी अनेक घातक कचरा हा दोन्ही प्रकारच्या कचऱ्यात मिसळला जातो. त्यामुळे घरातील घातक कचरा जसे सॅनिटरी नॅपकिन्स, हगीज, पेंटचे डबे, बॅटरी, दाढीचे ब्रेड, चाकू , सुरी, औषधांची पाकीटे, गुडनाईट कॉईल आदी प्रकारच्या कचऱ्यासाठी स्वतंत्र कचरा पेटी देण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्यानुसारच आता पुढील आर्थिक वर्षांपासून नगरसेवक निधीतून देण्यात येणाऱ्या कचरा पेट्यांची संख्या ही तीन असेल. ज्यामध्ये ओला आणि सुका कचऱ्यासोबत घातक कचऱ्यासाठीही एक कचरा पेटी दिली जाणार आहे. ज्याद्वारे प्रत्येक सोसायटीला या तिन्ही प्रकारच्या कचऱ्याचे वर्गीकरण करून स्वतंत्र पेट्यांमध्ये ठेवणे बंधनकारक राहणार आहे.

लोकांना केले आवाहन

यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अशोक खैरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, घातक कचऱ्यासाठीही यापुढे स्वतंत्र पेटी दिली जाणार असल्याचे सांगितले. यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच स्थायी समितीच्या मान्यतेनंतर या पेट्यांचे वाटप होईल. त्यामुळे ओला आणि सुका कचऱ्यासह यापुढे नागरिकांना घरातील घातक कचराही वेगळा ठेवावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

यापुढे सार्वजनिक ठिकाणी नाही जाणार कचरा

स्वच्छ सर्वेक्षण २०२०मध्ये सामुदायिक कचरा पेट्या कमी करून घरोघरी कचरा जमा करण्यावर अधिक देण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे कचरा पेट्या दोन हाताळला जाणार नाही. सोसायट्यांमधील उचलला जाणाऱ्या कचरा पेट्या या थेट कॉम्पॅक्टरला लावून त्यात रिकाम्या केल्या जाणार आहेत. परंतु सार्वजनिक ठिकाणी त्या रिकाम्या करता येणार नाही. त्यामुळे यापुढे २४० आणि १२० लिटरची कचरा पेटी ही आता थेट कॉम्पॅक्टरला लावून त्यातील कचरा त्यात जमा केला जाणार आहे.


हेही वाचा – तीन वर्षांनंतर नगरसेवकांना दिले जाणार सभाशास्त्र


 

First Published on: March 1, 2020 11:00 PM
Exit mobile version