माटुंग्यातील आश्रमातून तीन मुली बेपत्ता

माटुंग्यातील आश्रमातून तीन मुली बेपत्ता

Missing

माटुंग्यातील श्रदानंद महिला आश्रमाततून तीन अल्पवयीन मुली गुढरीत्या बेपत्ता झाल्या आहेत. या प्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलींच्या बेपत्ता होण्यामागचे कारण कळू शकले नसून, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

माटुंगा पूर्वेकडील श्रदानंद महिला आश्रमात १५० मुली आहेत. त्यातील बळीत मुलीचे प्रमाण अधिक असून काही मुलींचे पालक त्यांना सांभाळू शकत नसल्यामुळे त्यांची रवानगी आश्रमात केली जाते. सकाळची आश्रमातील मुलींना खेळण्यासाठी तसेच व्यायामासाठी मैदानात जाण्याची मुभा दिली जाते. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे मुली मैदानात खेळण्यासाठी उतरल्या होत्या, त्यापैकी १२ ते १५ वयोगटातील तीन मुली मैदानातून पुन्हा आश्रमात न आल्यामुळे केअर टेकर आणि कर्मचार्‍यांनी त्यांचा शोध घेतला. आश्रमातील खोल्या, हॉल, स्वछतागृह शोधून त्यांचा कुठेही शोध न लागल्यामुळे अखेर आश्रमातील केअर टेकर यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मुली अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. या मुलीच्या शोधासाठी एक पथक तयार केले असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत भोईटे यांनी दिली.

गूढरीत्या बेपत्ता झालेल्या मुलींपैकी १२ वर्षाची मुलगी नरिमन पॉईंट येथील झोपडपट्टीतील असून तिच्या आईने बालकल्याण समितीकडे केलेल्या अर्जावरून तिला बालकल्याण समितीने सहा महिन्यांपूर्वी माटुंग्यातील श्रदानंद आश्रमामध्ये ठेवण्याची परवानगी दिली होती. दुसरी १५ वर्षाची मुलगी असून तिही बालकल्याण समिती डोंगरी यांचे आदेशावरून तीन महिन्यांपूर्वी दाखल झाली होती. तिसरी मुलगी १५ वर्षाची असून, गुन्ह्याच्या प्रकरणात ती बळी पडल्याने तिला महिन्याभरपूर्वीच आश्रमात आणण्यात आले होते. आश्रमातून गुढरीत्या बेपत्ता झालेल्या मुलींचे बेपत्ता होण्यामागचे कारण कळू शकलेले नसून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

First Published on: December 19, 2018 4:42 AM
Exit mobile version