६२ लाख रुपयांच्या लूटप्रकरणी तीन मुख्य आरोपींना अटक

६२ लाख रुपयांच्या लूटप्रकरणी तीन मुख्य आरोपींना अटक

बोगस दस्तावेजच्या आधारे फसवणुकीप्रकरणी आरोपीस अटक

मुंबई : खार येथे दिवसाढवळ्या एका फ्लॅटमध्ये घुसून एका महिलेसह तिच्या दोन्ही मुलांना डांबून घातक शस्त्रांचा धाक दाखवून सुमारे ६२ लाख रुपयांच्या लुटप्रकरणातील तीन वॉण्टेड आरोपींना अखेर खार पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद सोहेल मुनेद्दीन अन्सारी, मंजुर अब्दुल अहमद शेख ऊर्फ कालिया आणि रफिकअली कुतुबअली मोहम्मद अक्रम इसाक सिद्धीकी ऊर्फ पतलू अशी या तिघांची नावे आहेत.

या तिघांकडून पोलिसांनी दहा लाख रुपयांची कॅश, पाच ते सहा मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे. अटकेनंतर या तिघांनाही चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. त्यात मोहम्मद वारीश मोहम्मद आरिफ शेख, मोहम्मद अक्रम अब्दुल समर इंद्रीसी आणि सुजीतकुमार जयवंत ठाकूर यांचा समावेश होता. या गुन्ह्यांत वशीर अली अहमद या आरोपीला वॉण्टेड दाखविण्यात आले असून त्याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोहीनूर नादीरअली सय्यद ही महिला तिच्या कुटुंबियांसोबत खार परिसरातील भूमी गोविंद अपार्टमेंटमध्ये राहते. ५ सप्टेंबरला तिच्या घरी कुरिअर देण्याचा बहाणा करुन तीन अज्ञात तरुणांनी प्रवेश केला. या तिघांनी घातक शस्त्रांचा धाक दाखवून या तिघांना ओढणीने एका रुममध्ये बांधून ठेवले.

त्यानंतर कपाटातील सुमारे ६० लाख रुपयांची कॅश, १ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि दहा हजार रुपयांचा एक मोबाईल असा सुमारे ६२ लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पलायन केले. याप्रकरणी खार पोलिसांत रॉबरीचा गुन्हा नोंद होताच २२ ऑक्टोंबरला मोहम्मद वारीश, मोहम्मद अक्रम आणि सुजीतकुमार ठाकूर या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. या तिघांच्या चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आले. त्यांनी त्यांच्या इतर चार साथीदारांची नावे सांगितले होते. या चौघांचा शोधमोहीम सुरु असतानाच यातील मोहम्मद सोहेल याला हिमाचल प्रदेश, मंजुर शेख याला मालवणी तर रफिकअली सिद्धीकी याला उत्तर प्रदेशातून पोलिसांनी अटक केली तर वशीर अलीचा आता पोलीस शोध घेत आहेत. अटकेनंतर सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांच्या चोरीची कॅश आणि गुन्ह्यांतील मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे.

First Published on: October 27, 2018 8:41 PM
Exit mobile version