दंड भरायला सांगितला म्हणून तरुणाची ‘टीसी’ला मारहाण

दंड भरायला सांगितला म्हणून तरुणाची ‘टीसी’ला मारहाण

आरोपी अरुण रजनीश जगोटा (२८ वर्षे)

रेल्वे प्रवासादरम्यान सेकंड क्लास डब्याचा पास असतानासुद्धा फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करणार्‍या एका तरुणार्‍या तरूणाला पकडल्यानंतर त्याने टीसीला मारहाण केली आहे. स्थानकात हंगामा केल्याने रेल्वे पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. फर्स्ट क्लास डब्याचा पास नसल्याने टीसीने या तरूणाला कार्यालयात नेऊन दंड भरण्यास सांगितले. मात्र, त्या तरुणाने दंड भरण्यास नकार दिला आणि टीसीवरच हात उगारला.अरुण रजनीश जगोटा (२८ वर्षे) असे या तरुणाचे नाव असून त्याला अंधेरी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

तक्रारदार संतोष यादव आणि संदिप गोसावी हे दोघेही तिकीट तपासणीच्या भरारी पथकात काम करतात. सकाळी ६ वाजल्यापासून दुपार १२ वाजेपर्यंत मुंबई सेंट्रल ते विरार स्थानकादरम्यान ते तपासणी करत असतात. रविवारी दुपारच्या सुमारास अंधेरी ते चर्चगेट या लोकलमध्ये अरुण जगोटा हा तरुण फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करताना त्यांना आढळून आला. त्याच्याकडे सेकंड क्लास डब्याचा पास होता. मात्र तो फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करत असल्याने कारवाईच्या उद्देशाने त्यांनी त्या तरुणाला विलेपार्ले स्टेशनवरच्या कार्यालयात नेले आणि ३१० रुपये दंड भरण्यास सांगितले. मात्र तरुणाने उडवाउडवीची उत्तरे देत दंड भरण्यास नकार दिला. टीसी दंड भरल्याशिवाय सोडत नाही हे पाहून चिडलेल्या तरुणाने सरळ त्यांच्यावर हात उगारला आणि त्यांच्या चेहर्‍यावर असलेला चष्मा तोडला.

एवढेच करुन तो थांबला नाही तर कार्यालयाच्या बाहेर येवून ‘ये टीसी लोग मुझसे पाच हजार रुपये रिश्वत मांग रहे है’ असे ओरडायला सुरुवात केली. हा सगळा प्रकार पाहणार्‍या कार्यालयातील टीसींना त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण त्याने संदिप गोसावी या टीसी अधिकार्‍याचे शर्टच फाडले. कार्यालयातल्या लोकांनी अंधेरी रेल्वे पोलिसांकडे फोन करुन तक्रार दिल्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याला अटक करुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती अंधेरी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी दिली.

First Published on: December 12, 2018 4:03 AM
Exit mobile version