आजपासून राज्यात मान्सूनचा जोर वाढणार

आजपासून राज्यात मान्सूनचा जोर वाढणार

मान्सून

राज्यभरात मुसळधार पाऊस बसरत असणारा हा मान्सून देश व्यापत चालला आहे, मात्र मराठवाडा आणि विदर्भाकडे मात्र पावसाने चांगलीच पाठ फिरवली आहे. परंतु, हवामानात होत असलेल्या बदलामुळे येत्या शुक्रवारपासून म्हणजेच १९ जुलै पासून मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सून सक्रिय होणार असल्याची शक्यता स्कायमेट या हवामान वेध शाळेने वर्तवली आहे. स्कायमेटचा हा अंदाज खरा ठरला तर मान्सूनने पाठ फिरवलेल्या विदर्भासह मराठवाड्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार

मागील २४ तासांमध्ये कोकण तसेच गोवा या भागात पाऊस कमी झाला असून मुंबईसह उत्तर कोकण आणि गोव्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी पाऊस पडत आहे. दक्षिण कोकण तसेच गोवा वगळता येत्या २४ तासांत महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा जोर कमी राहील. तर १९ जुलैदरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. २१ आणि २२ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा जोर वाढणार आहे. या काळात महाराष्ट्रातील अंतर्गत भागांत मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे, असे स्कायमेटने सांगितले आहे.

किनारी भागात पावसाची तीव्रतेत वाढ

दरम्यान, मुंबईमध्ये २२ जुलैपर्यंत पावसाची तीव्रता अधिक राहणार नाही. मात्र, मुंबई, डहाणू आणि ठाणे या किनारी भागात पावसाची तीव्रतेत वाढ होणार असून २२ आणि २६ जुलै या कालावधी दरम्यान मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या उत्तर किनारी भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे.

First Published on: July 19, 2019 12:14 PM
Exit mobile version