मध्य रेल्वे उकाड्यात पश्चिम रेल्वे मात्र गारेगार

मध्य रेल्वे उकाड्यात पश्चिम रेल्वे मात्र गारेगार

प्रातिनिधिक फोटो

पश्चिम रेल्वेवर मे महिन्याच्या अखेरीस आणखी दोन नव्या कोर्‍या एसी लोकलची भर पडणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेचा प्रवास आणखी गारेगार होणार आहे. मात्र मध्य रेल्वेच्या प्रवाशांना यावर्षी सुद्धा मे महिन्यात एसी लोकल मिळणार नसल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास असाच उकाड्यात जाणार आहे. मध्य रेल्वेवर येणार्‍या एसी लोकलला आणि दोन महिने उशीर होणार आहे.

रेल्वे बोर्डाने पश्चिम व मध्य रेल्वेसाठी काही महिन्यांपूर्वीच बारा वातानुकूलित एसी लोकल गाड्यांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. २०१९ मध्ये या लोकल टप्प्याटप्यात दाखल होणार होत्या. मात्र प्रत्यक्षात मध्य रेल्वेला उन्हाळा संपत आला तरीसुद्धा एसी लोकलची प्रतीक्षा करावी लागणार आहे. परंतु दुसरीकडे मात्र पश्चिम रेल्वेसाठी आणखी दोन नव्या एसी लोकल दाखल होणार आहेत. या नव्या दोन एसी लोकल मेधा आणि भेल बनावटीच्या आहेत. या दोन्ही लोकल मुंबईत दाखल झाल्या असून मे अखेरीस सेमी वातानुकूलित लोकल ही मुंबईत धावणार आहे. तर एक एसी लोकलची चाचणी अद्याप सुरू आहे. काही तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन चाचणी केली जाणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली आहे.

मुंबईतील दमट वातावरणात मुंबईकरांसाठी पहिली एसी लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर डिसेंबर २०१७ मध्ये धावली. ही पहिली लोकल मध्य रेल्वेवर दाखल होणार होती. मात्र कुर्ला ते सीएसएमटी दरम्यान पादचारी पुलांची उंची कमी आहे आणि वातानुकूलित लोकलची उंची जास्त उंची यामुळे ती लोकल मध्य रेल्वे मार्गावर चालवण्यास तांत्रिक अडचण आली होती, अखेर पहिली एसी लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर चालविण्यात आली. तेव्हापासून मध्य रेल्वे प्रवाशांना पहिल्या वातानुकूलित लोकलची प्रतिक्षाच राहिली.

नव्या एससी लोकलचे वैशिष्ट्य
पश्चिम रेल्वेवर धावणार्‍या पहिल्या एसी लोकलमध्ये अनेकदा तांत्रिक बिघाड होत ती बंद पडायची. त्यामुळे नव्या एसी लोकलमध्ये हा तांत्रिक बिघाड दूर करण्याची जबाबदारी भारत हेवी इलेक्ट्रिकल लि. (भेल)वर सोपवण्यात आली होती. त्यामुळे नव्या एसी लोकलची बांधणी सुद्धा वेगळी आहे.या नव्या एसी गाडीची मोटार आणि इतर विद्युत उपकरणे गाडीच्या तळाला बसविण्यात आल्याने प्रवाशांना बसायला अधिक जागा उपलब्ध आहे. त्यामुळे यापूर्वीच्या गाडीपेक्षा ३५० अधिक प्रवासी या लोकलमध्ये सामावू शकतील.तसेच यामुळे वीजची ही मोठ्या प्रमाणात बचतही होणार आहे. मोटरची क्षमताही ५० टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. या एसी लोकलमध्ये आसन क्षमता १० टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. प्लॅटफॉर्मवर पोहचल्यानंतर कमी वेळात दरवाजे उघड-बंद होण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी १२ डब्यांतील सहा डब्यांमध्ये मोटर बसवण्यात आले आहे. सद्यस्थितीत चार डब्यांमध्ये मोटर आहे. अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली.

First Published on: May 13, 2019 4:15 AM
Exit mobile version