राज्य सरकारकडून अध्यादेश प्राप्त झाल्यानंतर तीन दिवसांत प्रभाग फेररचना

राज्य सरकारकडून अध्यादेश प्राप्त झाल्यानंतर तीन दिवसांत प्रभाग फेररचना

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य सरकारने अध्यादेश काढल्यावर फक्त तीन दिवसांतच प्रभाग फेररचना करण्यात येईल,अशी माहिती पालिका सूत्रांकडून मिळाली आहे. मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च २०२२ पर्यंत असून ८ मार्चंपर्यंत नवीन महापौर निवडणे अपेक्षित आहे ; मात्र पालिका निवडणुकीपूर्वी आरक्षण सोडत होणे आवश्यक असून त्यास विलंब होत आहे.

मागील फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीसाठी २०१६ च्या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यामुळे कदाचित आरक्षण सोडत जेवढी विलंबाने होईल तेवढाच विलंब निवडणुकीला होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी निवडणूक २०२२ मध्ये फेब्रुवारी ऐवजी एप्रिलमध्ये होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पालिका निवडणूक विभागामार्फत प्रभाग रचनेच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे समजते.

राज्य सरकारने मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी फेब्रुवारी २०२२ मध्ये वार्डाची संख्या २२७ वरुन २३६ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे नगरसेवक संख्येत ९ ने वाढणार आहे. पालिका सभागृहात आसनव्यवस्था अपुरी पडणार आहे.

त्यामुळे आता निवडणुकीपूर्वी प्रभाग फेररचना करणे आवश्यक आहे. पालिका निवडणूक विभाग कामाला लागले आहे ; राज्य सरकारकडून अध्यादेश प्राप्त झालेले नाहीत. अध्यादेश प्राप्त झाल्यानंतर फक्त तीन दिवसांत प्रभाग रचना तयार करुन मसुदा राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे.

पालिकेकने सुधारीत प्रभाग रचना सादर केल्यानंतर त्यावर अंतिम निर्णय निवडणुक आयोग घेणार आहे. निवडणुक आयोगाकडून ही प्रभाग रचना स्विकारल्यानंतर त्यावर सुचना व हरकती मागविण्यात येतील. या हरकती व सुचनांवर सुनावणी झाल्यानंतर प्रभाग रचना अंतिम होणार आहे.


 

First Published on: November 25, 2021 7:22 PM
Exit mobile version