मुंबई महापालिकेतील प्रलंबित मागण्या मार्गी न लावल्यास पालिका कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

मुंबई महापालिकेतील प्रलंबित मागण्या मार्गी न लावल्यास पालिका कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या व त्यांच्या प्रलंबीत मागण्या लवकरात लवकर मार्गी न लावल्यास पालिका कर्मचारी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील, असा इशारा मुंबई महापालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीतर्फे कामगार नेते बाबा कदम यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे. कर्मचारी समितीतर्फे बुधवारी पालिका आयुक्त इकबाल चहल यांना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबतचे एक निवेदन देण्यात आले. यावेळी, कामगार नेते सत्यवान जावकर, वामन काविस्कर, संजीवन पवार, मानसी कानीटकर, अशोक जाधवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

50 टक्के बायोमेट्रिक मशिन्स बंद

सध्या केंद्रात व राज्यात बायोमेट्रिक हजेरी बंद आहे. मात्र मुंबई महापालिकेच्या विविध कार्यालयात एका अतिरिक्त आयुक्त यांच्या हट्टापायी बायोमेट्रिक हजेरी पद्धत सुरूच ठेवण्यात आली आहे. आम्ही अनेकदा सांगूनही बायोमेट्रिक हजेरी पद्धती बंद करण्यात येत नसल्याची तक्रार बाबा कदम यांनी व्यक्त केली. यातही 50 टक्के मशिन्स या बंद अवस्थेत धूळ खात पडून आहेत, असे कामगार नेते बाबा कदम व वामन काविस्कर यांनी सांगितले.

पालिका कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच 5 लाख रुपये रकमेची कॅशलेस आरोग्य गटविमा योजना पुन्हा लागू करण्यात यावी. सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यात याव्यात. सातव्या वेतन आयोगाच्या तात्काळ अंमलबाजवणी करावी. 10 ते 30 वर्षे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रगती योजना सुरू करण्यात यावी. जानेवारी 2020 पासून ते जुलै 2021 पर्यंतची कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता थकबाकी देण्यात यावी. पालिकेतील खासगीकरण व कंत्राटीकरण थांबवावे. विविध खात्यातील रिक्त पदे भरण्यात यावी. कोविडचा प्रादुर्भाव पाहता ज्या कर्मचार्यां कोविड होतो त्यांना अगोदर 17 दिवसाची विषेश रजा देण्यात येते त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना 17 दिवस रजा द्यावी, त्यांचे पगार कापू नये, आदी मागण्या कर्मचारी संघटनेमार्फत करण्यात आल्या आहेत.


हेही वाचा – Nagar Panchayat Election Result 2022 Live Update: राज्यातील नगर पंचायत निवडणुकीत भाजप क्रमांक एकच पक्ष

First Published on: January 19, 2022 8:13 PM
Exit mobile version